संपादकीय : प्रामाणिकता : वास्तव आणि आदर्श !

नितीन गडकरी

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वहात आहेत. अनेक राज्यांमध्ये मतदानप्रक्रिया नुकतीच पार पडली. या माध्यमातून भावी नेते होणार असलेल्या उमेदवारांविषयी सर्वांनाच काही प्रमाणात जाणून घेता आले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एक विधान केले. ते म्हणाले, ‘‘भारतात पैशांचा नव्हे, तर देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या नेत्यांचा अभाव आहे.’’ गडकरी यांचे विधान देशातील प्रत्येकालाच खोलवर विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. ‘प्रामाणिकपणा’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. मग तो सामान्य माणसासाठी असेल किंवा राजकारणातील नेत्यासाठीही ! प्रामाणिकपणा अंगी असेल, तर नेतृत्वाचे शिखर गाठता येते. सध्याच्या काळात ‘प्रामाणिकपणा’ असणार्‍या व्यक्ती समाजात आणि राजकारणात हातांच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असतील. त्यामुळे गडकरी यांनी केलेले हे विधान निश्चितच कालसुसंगत आहे. प्रामाणिकपणाला लागलेली उतरण पहाता आज कुणीतरी यावर भाष्य करणे आवश्यकच होते.

प्राचीन काळापासून भारतात राजांची परंपरा आहे. त्यांच्या राज्यकारभाराचा पसारा किंवा व्याप अतिशय मोठा होता. काही राजांचे तर प्रचंड मोठे साम्राज्यच असे. या साम्राज्याचा डोलारा मजबूत होता; कारण त्याचा पाया प्रामाणिकपणा, नैतिकता, चारित्र्य यांवर आधारित होता. एकदा विलंब झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज रात्री राजगडावर पोचले होते; पण त्यांचीच आज्ञा असल्याने तेथील पहारेकर्‍याने त्यांच्यासाठी गडाचे दरवाजे उघडले नाहीत. अर्थात् तो महाराजांना ओळखतच नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचाच आदेश त्याने ऐकून दाखवला. ‘महाराजांचे नाव घेत शत्रूच गडावर येण्याचा प्रयत्न करत असेल’, असा विचार त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने पहाट होईपर्यंत दरवाजा उघडला नाही. महाराजांनाही संपूर्ण रात्र गडाबाहेर रहावे लागले. सकाळी जेव्हा पहारेकर्‍याला वास्तव समजले, तेव्हा तो कडेलोटाच्या विचाराने भयभीत झाला; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या प्रामाणिकपणाविषयी त्याचे कौतुक करून त्याला शाबासकी दिली आणि म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचे स्वराज्य उभे आहे.’’ आज जर अशी घटना कुठे घडलीच, तर पैशांच्या थैल्या संबंधितांकडे पोचतात आणि कामे आतल्या आत होऊनही जातात. सध्याच्या काळात ही घटना घडली असती, तर त्या पहारेकर्‍याची नोकरी नक्कीच गेली असती वा आताच्या लोकप्रतिनिधींनी त्याला भलतेसलते सुनावले असते आणि त्याच्या श्रीमुखात लगावलीही असती. महाराजांच्या काळात जसे विश्वासू, प्रामाणिक लोक होते, तसे आजच्या काळातील किती नेत्यांकडे आहेत ? हेही पहायला हवे.

मराठ्यांच्या इतिहासात प्रामाणिक आणि प्रजाहितदक्ष असा शासक म्हणून माधवराव पेशवे यांचे नाव ओळखले जाते. त्यांच्याप्रमाणेच रामशास्त्री प्रभुणे हेही त्या काळात ‘प्रामाणिक’ म्हणून ओळखले जात. एकदा नाना फडणीस यांनी रामशास्त्रींना विचारले, ‘‘तुमचा मुलगा विशेष शिकलेला नाही, तर त्याला कोणत्या पदावर काम द्यायचे ?’’ यावर रामशास्त्रींनी सांगितले, ‘‘त्याला राजवाड्यात कपडे धुवायला द्या !’’ ते जवळजवळ ३० वर्षे मराठ्यांच्या सेवेत होते; पण ‘प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ न्यायाधीश’ म्हणून आजही त्यांना तितक्याच मानाने ओळखले जाते. त्यांचे प्रामाणिक आचरण सर्वांच्याच स्मरणात आहे. मौर्य सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीतही प्रामाणिकतेवरच भर दिला जात असे. या सर्वांनी राजकारण केले, अर्थात् ते राष्ट्रकारणासाठी होते. धर्मसत्तेच्या अधिपत्याखाली केलेले ते राजकारण होते. कुणीही अप्रामाणिकपणा केल्यास त्या काळात दंडाची भीती होती. त्यामुळेच प्रामाणिकपणाचा पाया टिकून राहिला. लोकमान्य टिळक किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर हे जरी राजे नसले, तरी त्यांनी केलेले राजकारण हेही हिंदुकारणासाठी होते, तसेच ते प्रामाणिक होते. त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने जनता उभी होती.राजकारणाची ही नीती आजचे नेते अवलंबत नाहीत, उलट तिला धुडकावून आपापली (अ)नीती स्थापित करू पहातात. त्यामुळे नीतीचा पाया डळमळीत होतो. मग तेथे दंडाचे भयच उरत नाही. मस्तवालपणा वाढतो. सत्तेच्या उन्मादात आपण चिखलरूपी राजकारणात किती खोलवर जाऊन अडकलो आहोत, हे समजतही नाही. अर्थात् या चिखलात एखादेच कमळ उगवते, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याच्या नेत्यांचे हात भ्रष्टाचार, बलात्कार, तसेच गुन्हेगारी यांमध्ये बरबटलेले आहेत. आजच्या नेत्यांमधील आदर्श विचारल्यास तरुण पिढी राहुल गांधी यांचे नाव घेते. त्यांना कशासाठी आदर्श मानावे ? आधी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करायची आणि दुटप्पी भूमिका घेत आता ‘केजरीवाल यांनाच मते द्या’, असे आवाहन करत फिरायचे, अशा प्रकारे फिरवाफिरवी करणे, हे राहुल गांधी यांना चांगलेच जमते. ममता बॅनर्जी यांचाही आदर्श घेतला जातो. खरे तर ममता बॅनर्जींच्या राज्यात हिंदु असुरक्षित तर आहेतच, त्याही पुढे जाऊन सांगायचे, तर त्यांच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार आणि अनैतिकता यामध्ये एकापेक्षा एक विक्रम केले आहेत. अशांचा आदर्श घेऊन आपण देशाला कुठे नेत आहोत ? आपल्या विधानाशीही प्रामाणिक न रहाणारे ते कसले नेते ? माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावरही २०० महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. असे कलंकित नेते देशाचा विकास कसा साधणार ? देशाला सुराज्य कसे देणार ? अशांच्या कारभारामुळे भारतावर बट्टा लागतो. राजकारण भरकटून ते दिशाहीन होते.

प्रामाणिकपणा घरातूनच यायला हवा !

मनात प्रामाणिक हेतू बाळगून राज्यकारभार केल्यासच जनतेचे हित साधले जाईल. प्रामाणिकपणा त्यागून लाचारी पत्करायची नाही. उलट प्रामाणिक राहून आपला सुसंस्कृततेचा वारसा पुढे चालवायला हवा. कर्तव्याशी प्रामाणिक रहायला हवे. हा प्रामाणिकपणा कुठून विकत घेता येत नाही. तो प्रत्येकाच्या घरातूनच यायला हवा. यासाठी संस्कारांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळायला हवे. शाळा-महाविद्यालयांमधून सद्गुणांची शिकवण मुलांना द्यायला हवी. त्यासाठी तसा अभ्यासक्रमही हवा. हे सर्व आत्मसात करून सद्सद्विवेकबुद्धीशी एकनिष्ठ राहून वर्तन करणे, म्हणजे प्रामाणिकपणा होय; म्हणूनच समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले !’ प्रामाणिकपणाच्या पायावर राष्ट्राचा यशस्वी डोलारा उभा राहील. प्रामाणिकतेचा पाया भक्कम होण्यासाठी प्रयत्नरत रहाणे हे नेत्यांनी लक्षात ठेवावे !

प्रामाणिकपणा त्यागून लाचारी न पत्करता प्रामाणिक राजांचा आदर्श घेऊन प्रजाहितदक्ष नेते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !