प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला
‘देवीदेवता आणि उपासनापद्धत यांची विविधता ही एकाच तत्त्वाच्या अधिष्ठानावर रुचीभेदाने झाली’, असे आपल्याकडे अनेक ठिकाणी सांगितले आहे. त्यामुळे आपल्याकडे अगणित प्रकारचे वैविध्य आढळते.
एकं सत् विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः ।
– ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १६४, ऋचा ४६
अर्थ : एकच सत्तत्त्व (ईश्वर) आहे. त्या एकच सत्तत्त्वाला ज्ञानीजन पुष्कळ प्रकारची नावे देतात. त्यालाच इंद्र, वरुण, यम, अग्नि, वरुण असेही म्हणतात.
अधिक स्पष्ट करून सांगायचे, तर
यदङ्घ्र्यभिध्यानसमाधिधौतया धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः ।
वदन्ति चैतत् कवयो यथारुचं स मे मुकुन्दो भगवान् प्रसीदताम् ।।
– श्रीमद्भागवत, स्कन्ध २, अध्याय ४, श्लोक २१
अर्थ : विद्वान पुरुष ज्यांच्या चरणकमलांच्या चिंतनरूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करत रहातात, ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, असे म्हटले जाते. प्रत्येकाची आवड, स्वभाव वेगवेगळे असतात. त्या सगळ्यांना उपयुक्त व्हावे, यासाठी एकाच सत्य तत्त्वाचे विविध आविष्कार केले गेले, त्यातून निरनिराळ्या देवीदेवता आणि उपासनापद्धत विकसित झाल्या. एखाद्या गावाला जाण्याचे निरनिराळे मार्ग असावेत, त्याप्रमाणे हे समजले की, या विविधतेचा त्रास न होता सर्वांची सोय झाली, हे कळेल.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)