तुळजापूर – अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार श्री तुळजाभवानीदेवीचे चरणतीर्थ, तसेच काकड आरतीच्या वेळी भाविकांना थेट गाभार्यातून दर्शन घेता येत होते. या दर्शनामुळे भाविकांना अंतरिक समाधान मिळत होते. सध्या मंदिर संस्थानने गाभार्यातील दर्शन बंद केल्यामुळे भाविक यापासून वंचित आहेत. तरी श्री तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थ पूजेच्या वेळी भाविकांना थेट गाभार्यातून दर्शनाची प्रथा चालू करावी, या मागणीचे निवेदन पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या प्रसंगी अधिवक्ता शिरीष कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही विश्वस्तांनी १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी असाच ठराव केला होता. या विरोधात आम्ही धाराशिव येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी भाविक-भक्तांना देवीच्या चरणतीर्थ पूजेच्या वेळेस दर्शन उपलब्ध करून द्यावे, असे आदेश पारित केले होते. धर्मादाय आयुक्तांचे स्पष्ट आदेश असतांनाही विश्वस्तांनी भाविकांना दर्शन न देण्याचा अवैध निर्णय घेतला आहे. तरी विश्वस्त आणि प्रशासन या संदर्भातील न्यायालयाचे आदेश मानणार नसेल अन् मनमानी पद्धतीने कारभार करणार असेल, तर आम्हाला विश्वस्तांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करावी लागेल.