सांगली येथील अनधिकृत कॅफे तोडफोडीचे प्रकरण
सांगली, २२ मे (वार्ता.) – ‘विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव मोरे आणि विद्यमान पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांना शहरातील अनधिकृत कॅफेवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार निवेदने देऊन करण्यात आली होती; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अनधिकृत कॅफेमालकांकडून हप्ते घेत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. यासाठी हप्तेखोर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटना, पक्ष, प्रतिष्ठित लोक, शालेय हायस्कूल, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि पालक यांना घेऊन जनआंदोलन उभे करण्यात येईल’, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी २१ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अनधिकृत कॅफेची तोडफोड करणारे १६ कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘गेल्या १ वर्षापासून शहरातील अनधिकृत कॅफे मालकांवर कारवाई करावी; म्हणून पोलीस आणि महापालिका प्रशासन यांना निवेदन दिले आहे; मात्र या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गौतम कांबळे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत माळी हे अवैध व्यावसायिक अन् कॅफेमालक यांच्याकडून हप्ते गोळा करत आहेत, असा आरोप करून या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहोत.’’
कार्यकर्त्यांवर चुकीच्या गुन्ह्यांची नोंद !
विश्रामबाग येथील ३ अनधिकृत कॅफेंची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी आमच्या १६ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांनी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन त्यांच्यावर अकारण विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून बळजोरी करण्यात आली. सूत्रधार म्हणून माझे नाव घेण्यासाठी कार्यकर्त्यांवर दबाव आणला गेला. आमच्यावर कितीही खटले प्रविष्ट केले, तरी आमचे आंदोलन थांबणार नाही.
केवळ एका कॅफेला महापालिकेची अनुमती !
श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात ५ सहस्र दुकानांना परवाने दिले आहेत; मात्र त्यामध्ये केवळ एका कॅफेला अनुमती दिली आहे. याचा अर्थ उर्वरित कॅफे अनधिकृतपणे चालू आहेत, असा होतो. हे ठाऊक असतांना अनधिकृत कॅफेवर कारवाई न करणारे पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हाकेच्या अंतरावर असणार्या विश्रामबाग पोलिसांनी अनधिकृत कॅफेकडे दुर्लक्ष केले.’
राजकीय पदाधिकार्यांचे अनधिकृत कॅफे !
श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘वास्तविक अनधिकृत कॅफे राजकीय पदाधिकार्यांचे असल्याची मला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नावासह मी पोलीस अधीक्षकांना त्याची माहिती दिली आहे. राजकीय पाठबळ असल्यानेच कॅफेमालकांवर गुन्हा नोंद झालेला नाही. तरी मी पालकांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे. ते बाहेर जाऊन कॅफेमध्ये असे प्रकार करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.’’