सांगली येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून ३ अनधिकृत ‘कॅफें’ची तोडफोड !

  • अवैध ‘कॅफें’त चालत होते अश्‍लील प्रकार !

  • पोलिसांकडून १५ कार्यकर्ते कह्यात !

  • अनधिकृत ‘कॅफें’वर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करणार ! – नितीन चौगुले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

(कॅफे म्हणजे कॉफी मिळण्याचे छोटे उपाहारगृह)

सांगली, १७ जून (वार्ता.) – शहरातील विश्रामबाग परिसरातील ३ अनधिकृत ‘कॅफें’त अनेक वर्षांपासून अश्‍लील चाळे चालू असल्याचा आरोप करत १७ मे या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी या ३ अनधिकृत ‘कॅफें’त दगडफेक करत तेथील फर्निचर आणि साहित्य यांची तोडफोड केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. ‘सनशाईन’, ‘डेनिस्को’ आणि आणखी एका कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या तोडफोडीमुळे शहरातील अन्य कॅफे मालकांचे धाबे दणाणले असून विश्रामबाग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहरातील विश्रामबाग परिसरातील ३ अनधिकृत ‘कॅफें’त अनेक वर्षांपासून अश्‍लील चाळे आणि प्रकार चालू होते. या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी भेटून निवेदनाद्वारे माहिती देऊन या अनधिकृत कॅफेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांनी सोयीस्कररित्या कानाडोळा केला. त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत कॅफेंची तोडफोड केली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.

राज्यातील अनधिकृत कॅफेवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार !

या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘राज्यात बर्‍याच जिल्ह्यांत अनधिकृत कॅफेंत अश्‍लील प्रकार चालू आहेत. आतापर्यंत मी शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर नाशिक, धुळे, बुलढाणा, पुणे आणि कोल्हापूर येथे प्रशासनाने या अनधिकृत कॅफेंवर कारवाई केली आहे; मात्र सांगली येथे वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांनी अनधिकृत कॅफेेंवर कारवाई न केल्यास आमच्या संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘अनधिकृत कॅफेेंवर कारवाईसाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. २८ एप्रिल या दिवशी एका ‘कॅफे’मध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नाही. २ दिवसांपूर्वी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘कॅफे’मध्ये अश्‍लील चाळे चालत असून मुलींचे शोषण होत आहे. या प्रकरणात कॅफे मालकांवरही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आम्ही केली आहे.’’

असा चालतो ‘कॅफे’मध्ये अश्‍लील प्रकार !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या एका कार्यकर्त्यांने स्वतः जोडप्याला घेऊन अनधिकृत कॅफेंत अश्‍लील चाळे चालू असल्याचा भांडाफोड केला. एका कॅफेत ‘कॉफी मिळते का ?’ अशी चौकशी केल्यावर कामगाराने ‘येथे कॉफी नाही’, असे सांगितले. त्यानंतर जोडप्याला ‘कॅफे’मधील एका खोलीत जाऊन अश्‍लील चाळे करण्यासाठी खोली उपलब्ध असल्याचे कामगाराने सांगितले. त्या खोलीत राहून अश्‍लील चाळे करण्यासाठी जोडप्याकडून प्रति घंटा ३०० रुपये घेतले जातात. या अनधिकृत कॅफेत जोडप्यांसाठी छोट्या खोल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा प्रकार सर्रास चालत आहे. हे माहिती असतांनाही पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत, असा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला.

अनधिकृत ‘कॅफें’वर कारवाई करणार ! – महापालिका आयुक्त

याविषयी श्री. नितीन चौगुले यांनी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्या वेळी गुप्ता यांनी अनधिकृत कॅफेंवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन ‘२० मे या दिवशी नितीन चौगुले यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यात येईल’, असे सांगितले.

* सांगली शहरातील अनधिकृत ‘कॅफें’ची नावे

 कॅफे पत्ता
१. कॅफे सनशाईन  खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग
२. कॅफे हग वुईथ मग खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग
३. कॅफे हाऊस खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग
४. कॅफे क्रश खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग
५. कॅफे द व्हिला चंदूकाका सराफ
६. कॅफे डेनिस्को खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग
७. कॅफे क्राऊन माधवनगर रस्ता, शिवराज उपाहारगृहाजवळ
८. कॅफे द ब्लॅक बस स्थानकाजवळ
९. कॅफे रिसाला रिसाला रस्ता, गरवारे महाविद्यालयाजवळ
१०. कॅफे लव्ह बाईट शाहू उद्यान, स्टॅण्ड रस्ता
११. कॅफे आर्. मिरज रस्ता, भारत रुग्णालय
१२. कॅफे क्रश कॉलेज कॉर्नर

  (या अनधिकृत कॅफेंविषयी पोलीस-प्रशासनाला माहिती नाही कि ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे ?, हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक)