Russia China Ties : रशियाशी जवळीक साधल्यावरून अमेरिकेचा चीनवर संताप व्यक्त !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल

बीजिंग (चीन) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या दोन दिवसांच्या चीन दौर्‍याच्या वेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांची गळाभेट घेतली. रशिया आणि चीनच्या या वाढत्या मैत्रीमुळे अमेरिका चांगलीच संतापली आहे. जर चीन पाश्‍चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करतांना म्हटले की, रशियाला शस्त्रसज्ज करून चीन केवळ युक्रेनची सुरक्षा तर धोक्यात आणतच आहे; पण याचा युरोपवरही परिणाम होणार आहे. ते युरोपच्या सर्वांत मोठ्या धोक्याला प्रोत्साहन देत आहेत. आमच्या दृष्टीकोनातून या समस्येवर पुष्कळ सोपा उपाय आहे. रशियाने युक्रेनमधून माघार घेतली पाहिजे. त्याने क्रिमिया आणि युक्रेनमधील इतर भाग रशियाच्या कह्यातून मुक्त केले पाहिजेत. यामुळे शांतता प्रस्थापित होईल.

दुसरीकडे चीनने त्याच्या सैनिकी उत्पादनांची निर्यात तो पूर्ण दायित्वाने हाताळत असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आमच्यावर आरोप करून कोणतीही समस्या सुटणार नाही.

संपादकीय भूमिका

‘मी सांगीन तीच पूर्व दिशा’ या आविर्भावात वावरणारी अहंकारी अमेरिका असो अथवा अमेरिकेला शह देण्यासाठी संधीसाधूपणा करणारा चीन असो, दोघेही स्वार्थाची री ओढत आहेत. या दोघांच्या तुलनेत भारताचे परराष्ट्र धोरण व्यापक असल्याकारणाने अन्य देशांना हा भेद सहज लक्षात येतो !