छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यामधून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी ! – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नगर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनकार्य अलौकीक आणि भारावून टाकणारे होते. युवा पिढीने त्यांच्या कार्यामधून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. बापू ठाणगे यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि छावा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ‘अनापप्रेम’मधील विद्यार्थ्यांना फळे आणि दर्जेदार किराणा साहित्य यांचे वाटप करण्याच्या समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे आणि नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके उपस्थित होते.

श्री. प्रशांत खैरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. बापू ठाणगे आणि श्री. दत्ताभाऊ वामन यांच्या हस्ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांना शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती देऊन गौरवण्यात आले. अंकुश खंटेलोटे यांनी हार्मोनियम, तर अमर सोमवंशी यांनी तबल्याचे सुरेल वादन करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गीत गायले.

श्री. प्रशांत खैरे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी अविश्रांत लढले. शिवरायांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा मोगल साम्राज्याने धसका घेतला होता. मुठभर मावळ्यांना घेऊन धाडसाने लढणार्‍या संभाजी महाराजांचा घात जवळच्या मंडळींनीच केला, तरीही ते डगमगले नाहीत. संकटाला सामोर जाणे, छत्रपती होणे, हे संभाजी महाराजांनी अगदी लहान वयात दाखवून दिले. त्यांच्या जीवनकार्याचा इतिहास वाचतांना अंगावर रोमांच उभे रहातात. युवकांनी या इतिहासाचे वाचन केलेच पाहिजे.’’

नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद चवंडके म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार्‍या शिवप्रेमींनी त्यांच्या छाव्याची म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे काळाची आवश्यकता आहे.’’

‘अनापप्रेम’चे व्यवस्थापक अमृत भुसारी यांनी आभार मानतांना अंध-अपंग विद्यार्थ्यांना साहाय्याचा हात देत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम स्तुत्यच आहे, असे सांगितले.

व्यासपिठावर छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे आणि सौ. सरोजिनी भाकरे विराजमान होत्या. छावाचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव श्री. दत्ताभाऊ वामन यांनी स्वागत केले. या वेळी छावा प्रवासी वाहतूक-गाडी संघटनेचे अध्यक्ष श्री. दीपक वांढेकर, सर्वश्री सुनील बर्‍हाट, दीपक गहिले, दिलीप गायकवाड, जितु शिंदे, सुनील ठाकरे, बाळासाहेब बेल्हेकर, भैय्या चौधरी, ज्ञानेश्वर पाताळे, योगेश पवार यांच्यासह अनाप प्रेमच्या लेखा विभागातील प्रकाश गजे, संगणक प्रशिक्षक अनंत माळवे, महिला व्यवस्थापिका कु. श्रावणी वाळुंज आणि अनाप प्रेमचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.