प्रकृती चिंताजनक
ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया) – युरोपीय देश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर येथे १५ मे या दिवशी ७१ वर्षांच्या एका वृद्ध नागरिकाने ५ गोळ्या झाडल्या. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने फिको यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर साडेतीन घंटे शस्त्रकर्म करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर ते जनतेला भेटत असतांना गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली असली, तरी अद्याप या आक्रमणामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
१. रॉबर्ट फिको हे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा स्लोव्हाकियाचे पंतप्रधान बनले. रॉबर्ट फिको हे स्लोव्हाकियामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. रॉबर्ट फिको यांना वर्ष २०१८ मध्ये एका मोठा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर आणि सरकारविरोधी भावना भडकल्यानंतर त्यागपत्र द्यावे लागले होते; मात्र त्यानंतर ते पुन्हा पंतप्रधान बनले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे, तसेच भारत या कठीण परिस्थितीत स्लोव्हाकियाच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही या आक्रमणाचा निषेध केला आहे.