जळगाव – ‘लोकसभेत भाजपचे काम केले, तरी ते विधानसभेत साहाय्य करतील का ? मात्र आम्ही एका बापाची औलाद आहोत. हे भाजप काम करो अथवा ना करो, आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेचे काम करणार आहोत’, असे विधान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ मे या दिवशी येथे केले. भाजपला शिवसेना शिंदे गट लोकसभेसाठी साहाय्य करील; मात्र विधानसभेत ‘भाजप शिवसेना शिंदे गटाला साहाय्य करील का ?’, अशी शंका काही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याची चर्चा येथे चालू होती. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपविषयी कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आगे जो होगा वो हमारा नसीब. आमचे काम हे आग विझवणार्या चिमणीसारखे आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. आम्हाला जे करायचे होते ते शिंदे यांच्या समवेत जाऊन आम्ही उद्धव यांना करून दाखवले आहे. इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की, पाकिस्तानलाही साधा फटाका फुटला की सांगावे लागते की, ‘यात आमचा हात नाही.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत की, ज्यांना पाकिस्तान घाबरला. केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही कारवाया केल्या, तर विरोधक सांगतात की, हे ‘ईडी’चे सरकार आहे.