परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीनही गुरूंचे दर्शन होणे, ही साधकांना मिळालेली अनमोल भेटच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच चैतन्यमय वातावरण जाणवणे आणि आश्रमात गेल्यावर ‘सगळीकडे चैतन्य पसरले आहे’, असे वाटणे

‘२२.५.२०२२ या दिवशी होणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याविषयी मला पुष्कळ उत्कंठा होती. मला सकाळपासूनच वातावरण चैतन्यमय जाणवत होते. रथोत्सवाच्या दिवशी मी माझ्या यजमानांच्या (श्री. प्रभाकर, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८० वर्षे यांच्या) समवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले. मी आश्रमाच्या स्वागतकक्षात प्रवेश करताच ‘आश्रमात सगळीकडे चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवले. त्या दिवशी दुपारी २.३० वाजता आश्रमाच्या आगाशीत रथोत्सव पहाण्यासाठी साधकांना उपस्थित रहायला सांगितले. तेव्हा सर्व साधकांच्या मुखी ‘गुरुदेवांनी साधकांवर कशी कृपा केली !’, असाच विषय होता.

२. रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीनही गुरूंना नमस्काराच्या मुद्रेत पाहून साधकांचेही हात शरणागतभावाने जोडले जाणे आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येणे

सौ. वनिता बिच्चू

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान असलेल्या रथाचे नागेशी येथे आगमन झाले. त्या वेळी या तीनही गुरूंना नमस्काराच्या मुद्रेत पाहून साधकांचेही हात शरणागतभावाने जोडले गेले आणि साधकांच्या डोळ्यांत अश्रू आले. तीनही गुरु साधकांकडे पहात होते, तो क्षण अवर्णनीय होता. माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबतच नव्हते. आमच्यासाठी याहून आणखी अनमोल भेट काय असू शकते ! प्रत्यक्ष श्रीमन्नारायणाचे दर्शन तेही रथातून प्रत्यक्ष श्रीविष्णुरूपात आणि समवेत महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! हे पहाताच माझे देहभान हरपले. माझी ही भावस्थिती दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत टिकून होती.

३. रथोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचे चरण घट्ट पकडून त्यांना विनवणी करणे

दुसर्‍या दिवशी सकाळी मी दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात धरल्यावर मला पुष्कळ रडू आले. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचे चरण घट्ट पकडून त्यांना सतत विनवणी करत होते, ‘गुरुराया, मला तुमच्या चरणांशी ठेवा. मला दूर लोटू नका. मला केवळ तुमच्या चरणांशीच रहायचे आहे.’ माझी अशी स्थिती सकाळी ११ वाजेपर्यंत होती. नंतर मला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य सहन न झाल्यामुळे पुष्कळ थकवा आला. मी आश्रमात जाण्याचा प्रयत्न केला; पण मी जाऊ शकले नाही.

४. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूतींचे शब्दांत वर्णन करणे माझ्यासारख्या पामराला अशक्य आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे कधी होणार नाही’, असा हा डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. भगवंताच्या लीला अगाध आहेत. त्यातील ही लीला अनुभवायला दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वनिता बिच्चू (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक