Illegal Madrasa in Laxmanpuri:लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बेकायदेशीर मदरशातून २१ मुलांची सुटका !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील दुबग्गा येथील एका बेकायदेशीर मदरशातून २१ मुलांची सुटका करण्यात आली. पीडित मुलांनी सांगितले, ‘मदरशाचा मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आमचा बुद्धीभेद करायचा. तो आम्हाला स्वर्गात जाण्याचे आमीष दाखवायचा. हिंदूंमध्ये वाईट काम करणार्‍यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो, असे सांगण्यात येत असे.’ मदरशातून सुटका करण्यात आलेल्या ७ ते १५ वयोगटातील या मुलांना सध्या मोहन रोडवर असलेल्या शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी बाल संरक्षण आयोग आणि उत्तरप्रदेश पोलीस यांनी अयोध्येतून ९५ मुलांना घेऊन जाणार्‍या ५ मौलवींना अटक केली होती. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मणपुरीमध्ये नोंदणीकृत मदरशांची एकूण संख्या १३१ आहे, तर १११ मदरसे बेकायदेशीरपणे चालू आहेत.

मुलांचा बुद्धीभेद होणे धोकादायक ! – डॉ. सुचिता चतुर्वेदी, राज्य बाल संरक्षण आयोग

डॉ. सुचिता चतुर्वेदी

राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. सुचिता चतुर्वेदी यांनी सांगितले की, मुलांचा बुद्धीभेद होत असल्याचे प्रकरण म्हणजे एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. ज्या मुलांना नीट हिंदी बोलता येत नाही ते ‘पुनर्जन्म’ म्हणत आहेत. या मुलांना इस्लामचे  प्रशिक्षण दिले जात होते आणि त्यांना स्वर्गाची स्वप्ने दाखवली जात होती. चतुर्वेदी यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बेकायदेशीर मदरशांचे अन्वेषण करण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे.

मुले बिहारमधील रहिवासी

बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी इरफान आणि अफसान हे दुबग्गा येथे बेकायदेशीर मदरसा चालवत असल्याचे प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. दुबग्गा येथील एका घरात हा अवैध मदरसा चालवला जात होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी १ मे २०२४ या दिवशी मदरशातील २१ मुलांची सुटका केली. त्यानंतर या मुलांना बाल संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. ही सर्व मुले बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

वास्तविक बेकायदेशीर मदरसे चालू होईपर्यंत प्रशासन काय करते ? भारतातील बहुतांश मदरसे हे राष्ट्रविघातक कारवायांचे अड्डे बनल्याने त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक !