एच्.डी. रेवण्णा यांना अटक, तर प्रज्वल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला !

  • कर्नाटकातील आमदार एच्.डी. रेवण्णा आणि त्यांचा मुलगा खासदार प्रज्वल यांनी केलेल्या लैंगिक शोषणाचे प्रकरण !

  • अपहृत महिला सापडली !

डावीकडून एच्.डी. रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केलेले आरोपी आणि जनता दल (संयुक्त) चे नेते आमदार एच्.डी. रेवण्णा यांना विशेष अन्वेषण पथकाने अटक केली आहे. त्यांना त्यांचे पिता आणि देशाचे माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांच्या घरून अटक करण्यात आली. एच्.डी. रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात असंख्य महिलांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे आणि त्याचे व्हिडिओ बनवण्याचे आरोप आहेत. प्रज्वल यांनी या प्रकरणी बेंगळुरू येथील न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेली अटकपूर्व जामिनाची अंतरिम याचिका फेटाळण्यात आली आहे. ते सध्या जर्मनी येथे असल्याचे सांगितले जात आहे.

एच्.डी. रेवण्णा हे हासन येथील होलेनरसीपुर विधानसभा क्षेत्रातून ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. प्रज्वल हे वर्ष २०१९ मध्ये हासन येथून खासदार म्हणून निवडून आले असून आताही खासदारकीसाठी उभे आहेत. माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांचा भाऊ एच्.डी. रेवण्णा हेही मंत्री होते.

दुसरीकडे या प्रकरणात एक आठवड्यापूर्वी अपहृत पीडितेलाही हुंसुर तालुक्यातील कलेनहल्ली येथून सोडवण्यात आले आहे. पीडितेला राजशेखर नावाच्या व्यक्तीच्या फार्म हाऊसमध्ये बंद करून ठेवले होते. राजशेखर हा रेवण्णा कुटुंबियांचा निकटवर्तीय मानला जातो.

संपादकीय भूमिका 

अशा पिता-पुत्र राजकारण्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !