परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ केले. त्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी आनंदप्राप्तीसाठी साधनेसंबंधी अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक लहान-मोठी प्रवचने घेणे, असे विविध मार्ग अवलंबले. आता सर्वत्रचे सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.
१. घर आणि आश्रम येथे राहून साधना करण्यातील अंतर समजून घ्या !
हिंदुत्वनिष्ठ (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उद्देशून) : मी यापूर्वी इतर लोकांच्या आश्रमात गेलो आहे; परंतु तेथे रामनाथीसारखे (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमासारखे) वातावरण पाहिले नाही. इथे येण्यापूर्वी माझ्या मनात केवळ हेच होते की, हा आश्रमसुद्धा अन्य आश्रमासारखाच असेल. ‘येथे आश्रम म्हणजे एक कुटी असेल आणि तेथे कुणीतरी बाबा असतील’, असे वाटत होते. मी येथे रामनाथी आश्रमात आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा अनुभवली. येथे आल्यानंतर येथील साधकांना निःस्वार्थपणे कसलीही अपेक्षा न ठेवता सेवा करतांना पाहिले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : सगळे जण घर-दार सोडून येथे आले आहेत.
हिंदुत्वनिष्ठ : मी घर-दार सोडून आलेल्या साधकांना एकच प्रश्न विचारत होतो, ‘जर येथेच रहाता, तर ‘तुमचे पुढे काय होईल ?’ साधकांनी मला सांगितले, ‘‘सार्या विश्वाचा भार ईश्वर वहातो. इथे (आश्रमात) तर आमचे गुरुदेव आहेत. तेच आमची काळजी घेतात आणि पुढेही घेतील.’’ तेव्हा मी निश्चय केला की, मी पुन्हा गोव्याला येईन आणि १५ दिवसांसाठी येथे आश्रमात येऊन स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ देईन.
परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत ‘शिकणे’ हेच पहिले पाऊल असते. आपण घरी एकटे राहिलो, तर साधना होत नाही. आपण साधकांच्या समवेत राहिलो, तर एकमेकांना साधनेत साहाय्य करतो. एखाद्या साधकाची साधनेसंबंधी निराशेची अवस्था असेल, तर त्याला साधनेची तळमळ असणारा साधक साधनेच्या दृष्टीने साहाय्य करतो आणि त्याला निराशेतून बाहेर काढतो.
साधनेसाठी आश्रमात राहिल्यामुळे लाभ होतात. आपल्याकडून चूक झाली, तर ती आपल्या लक्षात येत नाही. घरात कुणी चूक दाखवली, तर तो चूक दाखवणार्याशी भांडण करतो. आश्रमात भांडण करू शकत नाही. आश्रमात जो दुसरा सांगतो, त्याचा चूक दाखवण्याचा उद्देश ‘साधकाला साधनेत साहाय्य करणे’, हा असतो. येथे अहंचा प्रश्नच येत नाही. तुम्ही आश्रम पहातांना पाहिले असेल, सनातनच्या आश्रमातील साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात ! साधक हे सर्व अहं नष्ट करण्यासाठी करतात. आपण चुका न लिहून कुणापासून लपवत आहोत ? ईश्वर तर सर्व जाणतोच ! त्या चुका सर्वांना सांगितल्या, तर अहं लवकर नष्ट होतो.
२. ईश्वरप्राप्ती हेच मनुष्याचे चिरंतन ध्येय असल्यामुळे काही दिवस सनातनच्या आश्रमात राहून साधनेचा पाया बळकट करा !
हिंदुत्वनिष्ठ : पुष्कळ वेळा विचार केला; परंतु कधी साधना केली नाही. आता साधनेला आरंभ करीन.
परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेसाठी काही दिवस रहाण्यासाठी लवकर आश्रमात या. आम्ही तुमच्या येण्याची प्रतीक्षा करू.
हिंदुत्वनिष्ठ : अवश्य येईन. येथे राहून १५ दिवस प्रत्यक्ष कृती करीन.
परात्पर गुरु डॉ. आठवले : व्यावहारिक जगापेक्षा साधनेत सगळे उलटे असते. येथे सर्वांचे ऐकावे लागते. साधनेत दुसर्यांना शिकवायचे नसते. स्वतःचा मनोलय, म्हणजे मन नष्ट करणे आणि बुद्धीलय करावा लागतो. व्यवहारात सामान्य व्यक्ती सर्व कृती स्वेच्छेने करते. ती म्हणते, ‘मला जे वाटते, तेच योग्य आहे.’ साधनेत याच्याविरुद्ध असते. येथे स्वेच्छेने करण्यापेक्षा परेच्छेने करावे लागते. दुसरा साधक जे म्हणेल, तसे करत गेलात, तर पुढे ‘ईश्वरेच्छा काय आहे’, हे आपल्या लक्षात येते. कोणत्याही प्रकारे साधनेचा आरंभ झाला, तरी साधनेत पुढे जातो. त्या दिशेने आणि प्रत्येक पाऊल योग्य प्रकारे टाकत गेलो, तर साधना होते आणि शेवटी सच्चिदानंदावस्था प्राप्त होते ! कार्यासंबंधी चालू असलेल्या गोष्टी या जीवनातील तात्पुरत्या अवस्था आहेत, उदा. आता हिंदु राष्ट्राची स्थापना. शेवटी ही अवस्थासुद्धा मायेचाच भाग आहे ना ? व्यक्तीला कायमस्वरूपी चिरंतन जे पाहिजे, ते आहे ईश्वरप्राप्ती म्हणजेच, ‘सच्चिदानंद अवस्था’. ती साधना केल्यावरच प्राप्त होते ! तुम्ही आश्रमात साधना करण्याच्या उद्देशाने अवश्य या.
येथे राहिल्यावर ‘परेच्छेने कृती करणे’, हा साधनेचा पाया, तुम्ही दोन आठवड्यांत शिकाल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावी साधना चालू ठेवायची आहे आणि तेथे आपले सेवाकेंद्र आहे. तेथे जाऊन तुम्ही साधकांच्या संपर्कात राहू शकता. साधनेविषयी त्यांना विचारू शकता. तेथे अवश्य जा. सर्वत्रचे साधक साधना करून पुढे जात आहेत, तर तुम्ही जाणार नाही का ?’