जरंडी (छत्रपती संभाजीनगर) येथील सभेत मंत्री दानवे यांना लाभार्थींनी विचारला जाब !
सोयगाव – ‘गेल्या २ वर्षांपासून आम्हा शेतकर्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही, आमचे ‘रेशन’चे धान्य बंद केले आहे. ८० कोटी लोकांना केंद्र सरकारने धान्यवाटप केल्याच्या गप्पा नका सांगू. आमचे धान्य का बंद आहे ? त्याचे उत्तर द्या. याविषयी सरकार दरबारी प्रश्न मांडा’, असा जाब महायुतीचे जालना येथील उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाभार्थींनी विचारला. जरंडी (तालुका सोयगाव) येथे २९ एप्रिल या दिवशी झालेल्या प्रचार सभेच्या वेळी हा प्रकार घडला. मंत्री अब्दुल सत्तारही या सभेला उपस्थित होते.
या वेळी दानवे यांनी ‘आधी ऐकून तर घ्या, ऐकल्याविना कसे समजेल’, असे उत्तर दिले. प्रचार सभेत दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला वर्ष २०२२ पर्यंत विनामूल्य रेशनचे गहू आणि तांदूळ दिले. तेव्हा ‘आम्हाला २ वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही, ते आधी चालू करा. आमच्याकडे ३ एकर शेती आहे. दुष्काळात धान्य मिळत नाही. त्यामुळे काय खावे ?’, असा जाब दोन्ही मंत्र्यांना लोकांनी विचारला. अचानक प्रश्न उपस्थित झाल्याने मंत्री दानवे आणि सत्तार यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी हबकले होते. केंद्रीय मंत्र्यांच्या सभेत लाभार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती लागलीच जिल्हाभरात पसरली.