नवी मुंबई, ३ मे (वार्ता.) – सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे देय असलेले सर्व लाभ देण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले. पालिका मुख्यालयात आयोजित कर्मचारी सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते एप्रिल मध्ये सेवानिवृत्त होणारे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, लेखा अधिकारी हरिभाऊ खोसे, मुख्याध्यापक जयश्री विधाटे, प्रशासकीय अधिकारी अंजली केणी आदी अधिकारी, कर्मचारीवृंद यांचा सन्मान करण्यात आला.
कैलास शिंदे म्हणाले की, महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांचे कष्ट अन् सचोटी यांमुळे हे शहर नावारूपाला आले आहे. अत्यंत प्रामाणिक कष्टाळू अशी मनोज पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात ४० दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प (टर्शरी प्रक्रिया प्रकल्प) मोठे प्रकल्प निर्माण केले, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
शहर अभियंता संजय देसाई म्हणाले की, मनोज पाटील हे मितभाषी आणि सर्वांशी जुळवून घेणारे शांत स्वभावाचे असल्याने अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकता आले. ६५० कोटीच्या जे.एन्.एन्.यू.आर्.एम्. प्रकल्पामध्ये निधी आणून कामे केली. पाणीपुरवठा विभागात खडतर परिस्थितीतही त्यांनी उत्तम काम केले. ‘अमृत १’ प्रकल्पामध्ये ८६ कोटी रुपये केंद्राकडून पाठपुरावा करून मनपासाठी मिळवले. यामध्ये राज्यात नावाजलेले टर्शरी ट्रिटमेंट प्रकल्प निर्माण केले. अशा प्रकारे प्रत्येकाने शहराच्या प्रति ‘जान’ ठेवून काम करणे आवश्यक आहे.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार म्हणाले की, या कर्मचार्यांमुळे नवी मुंबई हे देशातील एक क्रमांकाचे शहर निर्माण झाले आहे. आम्ही पदोन्नती देण्याच्या संदर्भात सेवा प्रवेश नियम दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.
सन्मानाला उत्तर देतांना मनोज पाटील म्हणाले, ‘‘कनिष्ठ अभियंता पदापासून आपण या पालिकेत काम चालू केले. सर्व कनिष्ठ आणि ज्येष्ठ सहकार्यांच्या सहकार्याने आपण येथपर्यंत पोचू शकलो. सेवेतील कार्यकाळामध्ये जे काही शिकायला मिळाले, त्याचा उपयोग भविष्यात महापालिकेकरिता करावयाचा झाल्यास आपण कधीही उपलब्ध होऊ. आपल्या महापालिकेला ३१ वर्षे झाली असल्याने ही महापालिका तरुण आहे. त्यामुळे भविष्यात सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आणि अधिकारी या महापालिकेचा प्रगतीचा आलेख उंचावत नेतील.’’
हरिभाऊ खोसे सन्मानाला उत्तर देतांना म्हणाले की, सेवा निवृत्त होतांना समाधानी आहे. मनपाचा वीजदेयकावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यासाठी महापालिकेच्या वास्तूंवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावेत, शहरात महापालिकेची विविध खेळाची मैदाने विकसित करावीत.