सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे !

मूळचे सातारा येथील आणि सध्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. दीपक गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे पाहूया.

१. लहान वयातही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करणे

‘मी साधारण वर्ष २०१० पासून, म्हणजे ५ व्या इयत्तेत असल्यापासून दैनिक वितरणाची सेवा करत आहे. सकाळी लवकर उठून आवरून ८.३० ते ९.०० च्या कालावधीत बसस्थानकावर दैनिकाचा गठ्ठा घेण्यास जावे लागत असे. दैनिकाचा गठ्ठा आल्यानंतर अंक मोजणे, त्याच्या घड्या करणे आणि नंतर वर्गणीदारांना ते वितरण करणे, अशी ती सेवा होती. मी आरंभी पायी चालतच दैनिक वितरण करत होतो. नंतर बाबांनी एका साधकांकडून जुनी सायकल आणल्यावर त्यावरून दैनिकांचे वितरण करू लागलो.

२. दैनिकाच्या सेवेतून वडिलांनी शिकवलेले नियोजनकौशल्य !

मी काही वेळा दैनिकावर वर्गणीदारांची नावे न लिहिता दैनिक वितरणाला गेलो, तर एखादे दैनिक अधिक व्हायचे किंवा अल्प पडायचे. त्यामुळे बाबा सांगायचे, ‘५ मिनिटे उशीर झाला, तरी चालेल; पण दैनिकावर नावे लिहूनच वितरण करायचे.’ यातून मला ‘नियोजनबद्धता’ हा गुण शिकता आला.

३. सेवेमुळे समाजातील लोकांशी जवळीक होणे आणि लहान वयातच साधनेला आरंभ होणे

दैनिक वितरणाच्या सेवेमुळे माझी समाजातील अनेक व्यक्तींशी जवळीक झाली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळे शिक्षण घेत असतांना वितरणाच्या सेवेतून साधनेला आरंभ झाला. सकाळी लवकर येऊन शाळेच्या वेळेअगोदर सर्व दैनिक वितरणाची सेवा पूर्ण होत असे. त्यामुळे शाळेत वेळेत जाता येत असे.

४. सेवेमुळे आपोआपच धर्माचरण होणे

दैनिकाच्या सेवेमुळे मी घरून जातांना प्रतिदिन कपाळावर टिळा लावून जात असे. तसेच शाळेतही दिवसभर टिळा लावलेला असायचा. शाळेत अन्य कोणत्याही विद्यार्थ्याने (मुलाने) टिळा लावलेला नसल्याने काही मुले मला चिडवायची, तरी मी प्रतिदिन कपाळाला टिळा लावत होतो. टिळा लावल्यामुळे मला वेगळेच चैतन्य अनुभवता येते होते.

– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०२४)