मुंबई – शासकीय कागदपत्रे आणि ओळखपत्र यांवर वडिलांसह आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष कार्यवाही चालू झाली आहे. १ मे २०२४ या दिवशी आणि या दिवसापासून पुढे जन्म झालेल्या बाळाच्या सर्व शासकीय कागदपत्रांवर आणि ओळखपत्रांवर वडिलांसमवेत आईच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. महाराष्ट्रात १ मे २०२४ आणि त्यानंतर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावात व्यक्तीचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि अडनाव, असा क्रम असणे अपेक्षित आहे.
याविषयीच्या शासननिर्णयानंतर सामाजिक माध्यमांवर १ मेच्या पूर्वीच्या शासकीय कागदपत्रे आणि ओळखपत्र यांवरील नावांमध्येही पालट करायचा असल्याचा संदेश प्रसारित झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की, सर्व कागदपत्रांवरील नावे कशी पालटायची ?; मात्र ही माहिती खोटी आहे. आता दिनांकाची स्पष्टता आल्याने कोणताही गोंधळ रहाणार नाही.
महाराष्ट्रात १ मे २०२४ या दिवशी आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलांसाठी शैक्षणिक कागदपत्रे (उदा. जन्मदाखला, शाळेचा दाखला, विविध परीक्षांचे अर्ज आदी), महसुली कागदपत्रे (उदा. भूमीचा सातबारा, संपत्ती दस्तावेज आदी), वेतन चिठ्ठी, शासकीय कर्मचार्यांचे सेवापुस्तक, शासकीय अर्ज, मृत्यूदाखला आदींवर यापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे. अनाथ किंवा अपवादात्मक प्रसंगी नियमात सवलत देण्यात येणार आहे. विवाहित महिलांसाठी नाव लिहितांना स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि नंतर आडनाव हा क्रम पूर्वीसारखाच असणार आहे.
महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांचा सन्मान व्हावा, हा यामागील उद्देश आहे.