अनेक रुग्णांमध्ये निर्माण झाली प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या !
पुणे – कोरोना संकटाच्या काळात आधुनिक वैद्यांकडून प्रतिजैविकांचा (ॲन्टीबायोटिक्सचा) अतीवापर करण्यात आला. अनेक रुग्णांना आवश्यक नसतांनाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी ३ रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. यामुळे आता प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या जगभरात जाणवू लागली आहे, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. विशेष म्हणजे प्रतिजैविके देण्यात आल्याने कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. याउलट जीवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांच्या आरोग्याला त्यामुळे अपाय झाला, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या ४ लाख ५० सहस्र कोरोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची पडताळणी केली. हे रुग्ण जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीतील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या केवळ ८ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात आधुनिक वैद्यांकडून जगभरात सरासरी ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. पश्चिम प्रशांत विभागात ३३ टक्के रुग्णांना, तर आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये ८३ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेत २०२० ते २०२२ या कालावधीत प्रतिजैविके देण्याचे प्रमाण हळूहळू अल्प झाले; मात्र आफ्रिकेत ते वाढतांना दिसून आले.
प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजे काय ?
एखाद्या व्यक्तीला जीवाणू आणि बुरशी संसर्ग झाल्यानंतर त्यावरील उपचार म्हणून प्रतिजैविक औषधे दिली जातात. प्रतिजैविकांचा अतीवापर झाल्यास त्या व्यक्तीच्या शरिरात त्यासाठी प्रतिरोध निर्माण होतो. त्यामुळे जीवाणू आणि बुरशी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. यामुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे अवघड बनते. त्यातून संसर्ग झालेली व्यक्ती गंभीर आजारी पडण्यासह तिचा मृत्यूही होऊ शकतो.