सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकामागून एक येणार्‍या निरनिराळ्या विषयांवर संबंधित साधकांना अचूक मार्गदर्शन करणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ग्रंथलिखाणाच्या सेवेत गुंतलेले असतात. त्यासाठी ते दिवसातील बराच वेळ ग्रंथांच्या धारिकांचे संगणकावर वाचन करतात. पूर्वी ते संगणकावर सेवा करत असतांना बरेच साधक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. कुणाला सेवेसंदर्भातील अडचण असे, कुणाला अध्यात्मप्रसारासंबंधी अडचण असे, कुणाला आध्यात्मिक त्रासांसंदर्भात मार्गदर्शन हवे असे. एकीकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संगणकावर ग्रंथांचे वाचन करत आणि दुसरीकडे साधक येऊन प्रश्न विचारत असत. प्रत्येक वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लक्ष त्या साधकांकडे वेधले जात असे; परंतु प्रत्येकाच्या शंकेचे पूर्ण समाधान करणे, त्यांची अडचण सोडवणे, वेळ प्रसंगी साधकांची अडचण सोडवण्यासाठी अन्य उत्तरदायी साधकांना निरोप देणे, इत्यादी सर्व ते तेव्हाच्या तेव्हा करत असत. त्याच वेळी कधी ग्रंथांसंदर्भात निरोप देणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लिखाणासंदर्भात सूत्रे सांगणे इत्यादीही ते करत असत. त्यांचे वैशिष्ट्य, म्हणजे परस्परांशी संबंध नसलेले कोणतेही विषय असले, तरी त्यावर ते तितक्याच तत्परतेने उत्तर देत असत. अशा अनेक विषयांवर ते साधकांना मार्गदर्शन करत असतांना तितक्याच एकाग्रतेने त्यांची ग्रंथ-लिखाणाची सेवा चालू असे.

यासंबंधी विचार केल्यावर त्यांच्या कार्यासंबंधी माझ्या अल्पमतीला त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. उत्तरदायित्वाची जाणीव

‘हे कार्य माझे आहे. त्यामुळे या कार्याच्या अनुषंगाने जेवढे विषय समोर येतात, तेवढ्यांना उत्तरे देणे, ते विषय हाताळणे, त्यासंदर्भातील साधकांच्या शंकांचे निरसन करणे’, हे माझे उत्तरदायित्व आहे.

२. ‘मी केले नाही, तर अन्य कोण करील ?’, ही ध्येयनिष्ठा !

श्री. धैवत वाघमारे

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे त्यांचे ध्येय आहे. ‘हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मीच उभा राहिलो पाहिजे. मी केले नाही, तर अन्य कोण करील ?’, या विचारांनी ते सतत कार्यमग्न असतात. कुणालाही विन्मुख पाठवत नाहीत.

३. साधकांच्या अडचणी तत्परतेने सोडवल्यास साधकांच्या साधनेचा अमूल्य वेळ वाचणे

साधक एखादा प्रश्न घेऊन येतात. तेव्हा त्यांच्या सेवेत किंवा साधनेत काहीतरी अडचण आलेली असते. त्यामुळे त्यांना त्या त्या वेळी मार्गदर्शन केले, तर त्यांची सेवा, पर्यायाने त्यांची साधना एक पाऊल पुढे जाते. त्यांचा साधनेतील वेळ वाचतो. साधकांना त्यांच्या अडचणींसंदर्भात त्या त्या वेळी मार्गदर्शन न मिळाल्यास त्यांच्या साधनेची, पर्यायाने कार्याचीही हानी होते. त्यामुळे ते प्रत्येक अडचण तत्परतेने सोडवतात.

४. तीव्र तळमळ

साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आत्यंतिक तळमळ असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक शंकेचे समाधान करू शकतात.

५. सतत वर्तमानकाळात असणे

सनातन संस्थेचे सद्गुरु वसंत बाळाजी आठवले (सद्गुरु अप्पाकाका) यांनी लिहिलेल्या ग्रंथात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे एक वैशिष्ट्य सांगितले आहे. ते म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमी वर्तमानकाळात असतात.’ त्यामुळे एखादा विषय चालू असतांना अचानक दुसर्‍या विषयासंबंधी प्रश्न आला, तरी त्यांना पटकन त्या विषयाचे आकलन होते आणि त्या विषयाचे समाधान करता येते.

६. सर्वज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना सांगतात, ‘एकदा अध्यात्माचे ज्ञान झाले की, जगातील सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रत्येक विषयाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही.’ या तत्त्वानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक विषयावर मार्गदर्शन करू शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे एकदा नृत्यकलेसंदर्भात एका प्रसिद्ध नृत्यांगनेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नांसंदर्भातही त्यांनी अचूक दिशादर्शन केले.’

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.