स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून तिच्यातून आनंद घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

‘माझी आई श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी हिच्यामध्ये निर्माण झालेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची तळमळ आणि त्यातून तिला मिळत असलेला आनंद’ यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी

१. भावाच्या स्तरावरच्या प्रयत्नांचा आढावा देऊ लागल्यावर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्याचा विचार दृढ होणे

सर्व साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया नियमितपणे राबवतात. आरंभी मी आईला ही प्रक्रिया सांगितली. तेव्हा तिला वाटायचे, ‘मी ईश्वर आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव ठेवून माझे स्वभावदोष अन् अहं न्यून करण्यासाठी प्रयत्न करीन.’ त्याप्रमाणे ती भावाच्या स्तरावर सातत्याने प्रयत्नही करत होती. मी तिला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, ‘स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्यावर तुझे भावजागृतीचे प्रयत्न अधिक चांगले होतील’; पण त्या वेळी तिला ते स्वीकारता येत नव्हते. वर्ष २०२२ मध्ये देवाच्या कृपेने ती सौ. वैशाली राजहंस (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना भावाच्या स्तरावर करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा देऊ लागली. काकूंनी तिला भावाच्या स्तरावरचे प्रयत्न, कौटुंबिक स्तरावर प्रेमभाव वाढवणे आणि इतरांना समजून घेणे यासाठी प्रयत्न करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तिने प्रयत्न चालू केले. त्यातून तिला आनंद मिळू लागला. पूर्वी तिच्यामध्ये ‘अपेक्षा करणे’ या अहंची तीव्रता अधिक होती. काकूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न करतांना तिला राजहंसकाकूंचा पुष्कळ आधार आणि कृतज्ञता वाटू लागली. ती त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून व्यष्टी साधनेची दिशा घेऊ लागली.

अश्विनी अनंत कुलकर्णी

२. लहान-लहान प्रसंगांतून स्वतःच्या चुकांची आणि स्वभावदोष अन् अहं यांची तीव्रतेने जाणीव होऊन त्याविषयी खंत वाटू लागणे

वर्ष २०२२ च्या गणेशोत्सवासाठी आई आणि मी कोल्हापूरला गेलो होतो. सौ. राजहंसकाकूंनी दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनांमुळे त्या कालावधीत घडलेल्या काही प्रसंगांमध्ये आईला तिच्या चुका आणि स्वभावदोष अन् अहं यांची जाणीव व्हायला लागली. ‘आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपण इतरांना समजून घ्यायला अल्प पडत आहोत’, याची जाणीव होऊन तिला खंत वाटू लागली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच तिच्यात ती खंत निर्माण केली.

३. सर्व चुका आणि प्रसंग यांची नोंद करून स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे

कोल्हापूर येथे असतांनाच तिने तिच्याकडून होणार्‍या चुका आणि प्रसंग यांची नोंद करण्यास आरंभ केला. त्याचा आढावा तिने राजहंसकाकूंना दिला. त्यानुसार काकूंनी तिला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे लिखाण अन् स्वयंसूचना सत्र करण्यास सांगितले. तेव्हा तिने अत्यंत सकारात्मक राहून ‘मला पालटायचे आहे आणि गुरुदेव माझ्यात पालट करणारच आहेत’, या जाणिवेने प्रक्रिया राबवण्यास आरंभ केला.

४. प्रक्रिया राबवतांना स्वतःच्या गुणांच्या आणि शिकायला मिळालेल्या सूत्रांच्या आधारे चिकाटीने अन् सातत्याने प्रयत्न करणे

माझा व्यष्टी साधनेचा आढावा आरंभी सौ. सुप्रिया माथूर आणि नंतर कु. वृषाली कुंभार (आताच्या सौ. वैजयंती कुमार) घेत असतांनाच आईचे सारणी लिखाण अन् स्वयंसूचना सत्र घेणे चालू झाले. मला माझ्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात जी सूत्रे शिकायला मिळतात, ती मी आईलाही सांगते. त्यातून शिकून आईने त्याप्रमाणे तिच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले. त्यानुसार ती मनाचा नियमित आढावा घेणे, चुकांची तत्परतेने नोंद करणे, स्वतःला प्रश्न विचारून स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी जाणे, हे सर्व नियमितपणे करू लागली. मी घरी गेले की, तिने मला स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगणे चालू केले. तिने मनाची पूर्ण विचारप्रक्रिया आणि तिचे चिंतन करून ‘त्यात स्वतःचा कोणता स्वभावदोष किंवा अहं यांचा पैलू लक्षात येतो ? त्याची स्वयंसूचना कशी करायची ?’, हे सर्व विचारून आणि शिकून नियमितपणे प्रयत्न चालू केले. श्रीमती भुकनकाकू यांना स्वतःचे स्वभावदोष सांगणे, चुका विचारणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे, हेसुद्धा ती नियमितपणे करत आहे. ही सर्व प्रक्रिया करतांना तिने तिच्यातील चिकाटी, सातत्य, नियोजनकौशल्य, वक्तशीरपणा, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती यांसारख्या सर्व गुणांची जोड दिली आहे. त्यामुळे तिची प्रक्रिया अत्यंत परिणामकारक आणि आनंददायी झाली आहे. ती अंतर्मुखतेने स्वतःच्या मनाचे निरीक्षण करून त्याविषयी प्रांजळपणे सांगते. त्यातून ती आनंद घेते. जसजसा तिला प्रक्रियेचा आनंद मिळू लागला, तसे तिचे भावजागृतीचे प्रयत्नही पुष्कळ वाढले आहेत. आता सहज बोलत असतांनाही तिची भावजागृती होते. ती प्रतिदिन झोपण्यापूर्वी सूक्ष्मातून सर्वांची क्षमा मागते आणि मगच झोपते. ‘परम पूज्य गुरुदेव, आईची एवढी तळमळ आणि प्रयत्न पाहून मला पुष्कळ आनंद होतो अन् सातत्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्याची जाणीवही रहाते.’

५. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया चालू केल्यानंतर आईने ‘तिला आतापर्यंत आनंद का मिळत नव्हता ?’, याची जाणीव झाल्याचे सांगणे

व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करायला लागल्यावर ‘आता स्वतःची व्यष्टी साधना खर्‍या अर्थाने होत आहे’, असे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिला हलकेपणा आणि उत्साह जाणवू लागला अन् आनंद मिळू लागला. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘मी इतका वेळ वाया घालवला. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया चालू केल्यानंतर ‘मला आतापर्यंत आनंद का मिळत नव्हता ?’, हे कळले.’’ यावरून ‘गुरुदेव तिला तिच्या प्रक्रियेचा आनंद प्राप्त करून देत आहेत’, हे पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. आता तिच्या चेहर्‍यातही पालट झाला आहे. तिच्या गालावर ‘ॐ’ उमटला आहे. ‘गुरुदेवा, आपण आम्हा दोघींकडून प्रक्रिया राबवून घेत असल्यामुळे आमच्यातील संवाद पूर्वीपेक्षा अधिक चांगला होत आहे आणि दोघींनाही पुष्कळ आनंद मिळत आहे.

६. आई पुष्कळ छान आणि तळमळीने प्रयत्न करत असल्याचे राजहंसकाकूंनी सांगणे

आधी राजहंसकाकू आईचा एकटीचा व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायच्या. आता त्या आश्रमातील अन्य ज्येष्ठ साधिकांच्या समवेत तिचा आढावा घेतात. अन्य साधकांचे प्रयत्नही तिला समजून तिला आता शिकायला मिळत आहे. आईचा आढावा झाल्यावर माझी राजहंसकाकूंशी भेट झाली. तेव्हा काकूंनी आईचे प्रयत्न पुष्कळ छान आणि तळमळीने चालू असल्याचे सांगितले. आईने केलेल्या भावाच्या स्तरावरील प्रयत्नांतून तिच्या आढाव्यातील साधिकांनाही शिकायला मिळाल्याचे काकूंनी सांगितले. ते ऐकून माझा गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञताभाव दाटून आला आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

‘हे कृपाळू गुरुराया, आपल्या कृपेमुळेच आईला आणि मला या प्रक्रियेचा आनंद मिळत आहे. आईच्या या सर्व प्रयत्नांतून तुम्हीच मला शिकवत आहात’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– अश्विनी अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (२.३.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक