गोवा : विनाअनुमती वीजनिर्मिती यंत्र बसवणार्‍या ग्राहकांवर वीज खात्याची देखरेख

पणजी, २७ एप्रिल (सप) : ज्या वीजग्राहकांनी खात्याच्या अनुमतीविना घरी किंवा आस्थापनात वीजनिर्मिती करणारा जनरेटर, इन्व्हर्टर, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आदींपैकी कुठले यंत्र बसवलेले असेल, त्यांनी ते त्वरित बंद करून खात्याची रितसर अनुमती घेऊनच ते कार्यान्वित करावे, असे आवाहन वीज खात्याने केले आहे. असे यंत्र चालू करतांना खात्याकडून होणार्‍या वीजपुरवठ्याच्या वाहिनींशी त्याचा संबंध येणार नाही, असे पहावे. या सूचनेचे पालन न केल्यास मनुष्याच्या जीवनाला धोका पोचवल्याच्या प्रकरणी संबंधित ग्राहकाला पूर्णपणे उत्तरदायी ठरवले जाईल, अशी चेतावणी वीज खात्याने दिली आहे. गत आठवड्यात डिचोली येथील एका आस्थापनाचा इन्व्हर्टर चालू झाल्याने वीज खांबावर चढलेल्या वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने ही चेतावणी दिली आहे.