पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनाही मिळणार गणवेश !

मुंबई – खाद्यपदार्थ आणि औषधे यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेले अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही पोलिसांप्रमाणे गणवेश दिला जाणार आहे. गणवेश मिळण्याविषयीचा प्रस्ताव नुकताच या विभागाकडून राज्यशासनाला पाठवला आहे. राज्यशासनाच्या मान्यतेनंतर याविषयी पुढील कार्यवाही होईल. गणवेश पांढरा किंवा निळा असावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अन्नपदार्थांमधील भेसळ, बनावट औषधे आदी खाद्यपदार्थ अन् औषधे आदींविषयी स्वत: धाड टाकून किंवा नागरिकांच्या तक्रारीनुसार कारवाई करते.