नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्‍याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !

देवरे याच्यावर ६ गुन्हे नोंद, परिसरातून धिंड काढली !

नाशिक – सिडको आणि इंदिरानगरसह ग्रामीण भागातील नोकरदार, व्यावसायिक आणि काही राजकीय मंडळी यांना अवैधपणे १० टक्के व्याजदराने पैसे देऊन वसुली करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी वैभव देवरे याच्या विरोधात एकूण ६ गुन्हे नोंद झाले आहेत. देवरे याने भाजपचे पदाधिकारी जगन पाटील यांच्याकडून २० लाख रुपयांच्या मोबदल्यात ३ कोटी रुपयांची रोकड वसूल करून त्यांची मालमत्ता बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवरे याची राणेनगर परिसरातून धिंड काढण्यात आली.

देवरे याच्या विरोधात प्रविष्ट होणार्‍या तक्रारींनुसार या गुन्ह्याची व्याप्ती १०० कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. प्रतिदिनच तक्रारी प्राप्त होत असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याची नोंद घेऊन विशेष अन्वेषण पथक नियुक्त केले आहे. देवरे याने जगन पाटील यांना केलेल्या संपर्कातील त्यांचे संभाषण प्रसारित झाले आहे. त्यात देवरे याने अश्लील भाषेचा वापर केला आहे. असेच आणखी ४-५ तक्रारदारांशीही संभाषणात खालच्या पातळीवर जाऊन देवरे बोलत असल्याचे दिसून आले आहे.