उद्या २१ एप्रिल २०२४ या दिवशी ‘भगवान महावीर यांची जयंती’ आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
‘भगवान महाविरांनी धर्मसंघ व्यवस्थेची स्थापना केली. त्या संघ व्यवस्थेतील रचना कशी होती ? या धर्मसंघात असलेल्या साधकांचे ३ प्रकार आणि व्यवस्थेसाठी असलेली ७ विभिन्न पदे यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. भगवान महाविरांच्या संघ व्यवस्थेत साधनेला महत्त्व
भगवान महाविरांच्या संघ व्यवस्थेत आत्मानुशासनावर विशेष भर होता. मर्यादा पाळावी लागे; पण बळजोरी नव्हती. स्वेच्छेने आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करण्याचा प्रघात होता. विनयधर्माचे स्थान सर्वाेपरि होते. शुद्ध आचार, सहज अनुशासन, मोठ्यांचा आदर, सेवाभाव आणि सदाचार म्हणजेच विनय ! जात, पद, अधिकार आणि वय यांना गौण स्थान असून साधनेला महत्त्व होते. राजा-राजकुमार, ब्राह्मण-वैश्य इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांना संघात प्रवेश असून त्यांच्यात समानता होती. वयाचा विचार न करता आधी दीक्षा घेणारा ज्येष्ठ मानला जात होता. याविषयी भगवान महाविरांचे प्रतिपादन असे, ‘साप ज्याप्रमाणे कात टाकतो, त्याप्रमाणे पूर्वसंस्कार, म्हणजे गोत्र, कुल, जाती, व्यवसाय किंवा वयाचा विचार या सर्वांचा त्याग मुनी जीवन स्वीकारतांना झाला, तरच स्वरूप दर्शनाची योग्यता प्राप्त होऊ शकते.’
२. धर्मसंघात असलेले ३ प्रकारचे साधक
साधनेच्या दृष्टीने धर्मसंघात ३ प्रकारचे साधक असतात.
अ. प्रत्येक बुद्ध : जे आधीपासूनच संघटनेबाहेर राहून आध्यात्मिक साधना करत.
आ. स्थविर कल्पी : जे संघटनेच्या मर्यादेत आणि शिस्तीत राहून साधना करत.
इ. जिनकल्पी : विशिष्ट साधनेसाठी संघटनेचा त्याग करून स्वच्छंदपणे तपाचरण करत.
यातील प्रत्येक बुद्ध आणि जिनकल्पी स्वतंत्र असल्यामुळे त्यांना अनुशासकाची अपेक्षा नसते. खरे संघटन म्हणून दुसर्या गटातील स्थविर कल्पी लोकांचे असे. ते मात्र संघाच्या व्यवस्थेनुसार शिस्तबद्ध जीवनक्रम आचरत.
३. साधकांच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेली ७ विभिन्न पदे
साधकांच्या व्यवस्थेसाठी ७ विभिन्न पदे निर्माण केलेली होती.
अ. आचार्य : आचारविधी शिकवणारे
आ. उपाध्याय : शास्त्राभ्यास करवणारे
इ. स्थविर : वय, दीक्षा आणि अध्ययनाने अधिक अनुभवी
ई. प्रवर्तक : आज्ञा, अनुशासन याचे पालन करवणारे
उ. गणी : गणांची व्यावहारिक व्यवस्था बघणारे
ऊ. गणधर : ज्याच्यावर गणांचे संपूर्ण दायित्व असे.
ए. गणावच्छेदक : संघाच्या व्यवस्था पद्धतीचे विशेषज्ञ
‘संघात जे करायचे ते स्वेच्छेने आणि आत्मानुशासनाने व्हावे’, असा महत्त्वाचा संकेत सर्व स्तरांवर होता. त्यामुळे कुणीही कुणाला कुठलेही काम सांगतांना ‘आपली इच्छा असल्यास हे काम करावे’, असे म्हणत असत. कुणावरही कसलाही दबाव नसे.
इतक्या प्राचीन काळी संघटनेमध्ये इतके चांगले व्यवस्थापन विकसित होणे, हे खरोखर विस्मित करणारे आहे. कार्याचे विभाजन, श्रेणीनुसार दायित्वांचे वितरण आणि सर्वांचा स्वेच्छेने सहभाग या मूलभूत सुदृढ आधारांवर धर्मसंघाची उभारणी करण्यात आली.’
– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (साभार : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी लिहिलेल्या ‘भगवान महावीर’ ग्रंथातून)