Telangana Christian School Controversy : तेलंगाणा येथील मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे घालून येण्यापासून रोखल्याने शाळेची तोडफोड !

मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील कन्नेपल्ली गावात असणार्‍या ‘ब्लेस्ड मदर तेरेसा स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे परिधान करून शाळेत येण्यापासून रोखण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे, शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १५३ (अ) (धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि २९५ (अ) (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(सौजन्य : The Indian Express)

शाळा व्यवस्थापनानुसार १६ एप्रिल या दिवशी काही विद्यार्थी गणवेशाऐवजी भगवे कपडे घालून आले होते. मुख्याध्यापकांनी या मुलांना भगवे कपडे घालून येण्याचे कारण विचारले. मुलांनी उत्तर दिले की, त्यांनी हनुमान दीक्षा घेतली आहे, जी त्यांना २१ दिवस पाळायची आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांना त्यांच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जमावाने शाळेवर दगडफेक केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जमावाने शाळा व्यवस्थापनाला क्षमा मागण्यास सांगितले. जमावाने मुख्याध्यापकांना मारहाण केली आणि त्यांच्या कपाळावर टिळा लावल्याचा दावा करण्यात येत आहे.