प्रभु श्रीरामाचे बुद्धीकौशल्य आणि त्याने राज्य चालवण्यासाठी केलेला उपदेश

काल ‘श्रीरामनवमी’ झाली. त्या निमित्ताने…

प्रभु श्रीराम भरताशी चर्चा करतांना

‘वाल्मीकि रामायणा’त प्रभु श्रीरामाच्या बुद्धीची साक्ष पटावी, अशी अनेकानेक उदाहरणे दिसतात. इतकेच नव्हे, तर त्याच्या चरित्रातून भरपूर शिकवण घेता येते. प्रभु श्रीरामाचे जे १६ गुण वाल्मीकींनी वर्णिले आहेत आणि पुढे जाऊन नारदांनी ७० हून अधिक गुणांचे वर्णन केले आहे, त्यापैकी एकेका गुणासाठी एकेक जन्म अपुरा पडेल. ख्यातकीर्त लोकांकडे यातील एखाद-दुसरा गुण दिसतो. तथापि सर्व गुण सापडणारा अन्य कुणी मिळत नाही. त्यांनी केलेला भरतोपदेश वाचला, तरी राज्य कसे चालवावे ? याविषयी अनेक गोष्टी लक्षात येतात.

१७ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्रीरामाने केलेला भरतोपदेश’ याविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा:https://sanatanprabhat.org/marathi/784759.html

डॉ. सच्चिदानंद शेवडे

२. जाबालिद्वारे श्रीरामाला नास्तिक उपदेश

भरताने श्रीरामाची समजूत घालून अयोध्येत आणण्याकरता प्रयत्न केला; परंतु श्रीराम हा वचनपालन, तत्पर आणि सत्यप्रिय असल्याने त्यांनी भरताचा आग्रह मानला नाही. त्या वेळी मातांनीही श्रीरामाची समजूत घातली; परंतु राम दृढनिश्चयावर ठाम होते. श्रीराम- लक्ष्मण-सीता हे अरण्यात रहातात, कंदमुळे भक्षण करतात आणि वल्कले नेसतात, हे पाहून सर्वजण दु:खी झाले. त्या वेळी श्रीरामाची समजूत घालण्याकरता ‘जाबालि’ नामक नास्तिक मत मानणारा एक ब्राह्मण समोर आला आणि त्याने श्रीरामाला उपदेश केला.

तो म्हणाला, ‘या संसारात कोण कुणाचा बंधू आहे ? जीव एकटाच येतो आणि एकटाच नष्ट होतो. जो मातापित्यांविषयी आसक्त रहातो, तो वेडा समजला पाहिजे. कुणी कुणाचे नसते. एखादा माणूस प्रवासात जातांना वाटेत एखाद्या धर्मशाळेत विश्राम करतो. रात्री मुक्काम करतो आणि सकाळी उठून ती जागा सोडून निघून जातो. त्याचप्रमाणे माता, पिता, धन, गृह हे आवास (एका रात्रीपुरते मर्यादित) आहे. त्यावर सज्जन पुरुष आसक्त होत नाहीत. हे रघुनंदन, वडिलांचे एवढे साम्राज्य सोडून तू या काट्याकुट्यात, वनात, कुत्सित मार्गावर का चालत आहे ? राजकुमार रामा, अयोध्यानगरी तुमची एकवेणी घातलेल्या नारीप्रमाणे वाट पहात आहे. तुम्ही राज्योपभोग घ्या. अयोध्येत विहार करा.

राजा दशरथ हा तुमचा कुणीच नव्हता. तो निमित्त होता. ऋतुमती मातेच्या द्वारे वीर्य आणि रज यांचा संयोग झाल्यावर पुत्र जन्म होतो. राजा दशरथाला जिथे जायचे होते, तेथे तो गेला (निधन झाले), आता तू त्याच्याकरता का दु:ख कष्ट भोगत आहे ? यज्ञ, दान, धर्म, आचरण हे सगळे असत्य आहे. तू प्रत्यक्ष दिसणार्‍या राज्याचा उपभोग घे. पारलौकिक लाभाच्या मागे न लागता या राज्यात राहून सगळे उपभोग घे. तू भरताचे ऐक. वचन पालन करून सत्य मार्ग अनुसरून पुण्य मिळते वगैरे गोष्टी बाजूला सार आणि राज्य उपभोग. भरताचे मत तू मान्य कर आणि राज्याचा उपभोग घे.’

२ अ. जाबालीच्या बोलण्यामागील दुष्ट उद्देश : हे वाचल्यावर क्षणभर आपणास असे वाटते, ‘जाबालि योग्य बोलत आहे.’ या जगात कुणी कुणाचे नसते. दशरथ राजाचे निधन झाले, त्याच्यासह त्याला दिलेले वचनही संपले; पण यातच खरी गोम आहे. नास्तिकवाद्यांचे दाखवायचे आणि खाण्याचे दात वेगवेगळे असतात. हे विचार द्वंद्व सदैव आपल्या मनात चालू असते. एक उदाहरण देतो.

एखाद्या पंतप्रधानाने जनतेला दिलेले एखादे वचन पूर्ण केले नाही वा राहून गेले, तर त्याच्यावर ‘वचनभंगा’चा आरोप ठेवत सर्वजण टीका करतात. यात नास्तिकवादी अग्रेसर असतात. वचनभंग करणारा राजा हा उत्तम प्रजापालक आणि प्रजाहितदक्ष असू शकतो का ? याचे उत्तर ‘हो’ असेल, तर मग प्रत्येक वेळी पवित्र कुराणाची शपथ घेऊन ‘मी पृथ्वीराज चौहानवर आता आक्रमण करणार नाही’, असे खोटे बोलून आक्रमण करून पुन्हा प्रत्येक वेळी खोटे वचन देणारा आणि आक्रमण करणारा महंमद घोरी हा आदर्श मानावा लागेल. (घोरीने १७ वेळा हा वचनभंग केला आहे !)

‘आम्ही व्यापाराकरता आलो. आम्हाला राजकारणात पडायचे नाही’, असे म्हणून गोड बोलून खोटे वचन देणारे आणि हिंदुस्थानला गुलाम बनवणारे ब्रिटीश आदर्श मानावे लागतील.

आपल्या संस्कृतीत रामराज्य हेच आदर्श मानले गेले आहे; कारण रघुपासून श्रीरामापर्यंत सर्व राजांनी वचनबद्ध राहून सत्यप्रिय, धर्मपरायण राहून राज्य उपभोगाकरता नसून प्रजेचे पुत्रवत् पालन हे कर्तव्य मानून राजधर्म सांभाळला आहे.

महाभारतात एक सुंदर वचन आहे, ‘लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्मः सनातनः ।। (महाभारत, पर्व १२, अध्याय ५७, श्लोक ११), म्हणजे ‘या लोकी प्रजेला सुखी ठेवणे, हाच राजांचा सनातन धर्म आहे.’ संपत्ती उपभोग हा राजाचा धर्म नाही आणि जाबालि नेमके तेच करायला सांगत आहे. जाबालि श्रीरामाला राज्य उपभोग सांगत आहे, यात खरी गोम आहे. श्रीरामाच्या समोर वैचारिक द्वंद्व उभे राहिले; पण त्याने मनोनिग्रहाने त्याचे खंडण केले.

३. प्रभु श्रीरामाने केलेले जाबालि नास्तिकाचे मत खंडण

अनेकांच्या मनात शंका येते की, कौसल्येपासून भरतापर्यंत सर्व कुटुंबीय, पुरोहित, प्रजाजन, मंत्रीगण हे जर श्रीरामाला राज्य स्वीकारण्यास सांगत आहेत, ते तर सर्वजणही नास्तिकच मानावेत का ? याचे उत्तर फार सोपे आहे. अन्य मंडळी ‘राज्यारोहण’ हा श्रीरामाचा हक्क आहे आणि ते या पदाकरता सर्वार्थाने योग्य आहेत’, यासाठी आग्रह करतात. ‘दशरथांच्या पश्चात तुझे पुत्रकर्तव्य कर’, या हेतूने श्रीरामाला समजवत आहेत. याउलट जाबालि हा ‘माता-पिता हे कुणी कुणाचे नसतात. तू राज्य हे स्त्रीप्रमाणे उपभोग. पाप-पुण्य हा विचार करू नकोस’, असा विचित्र उपदेश जाणीवपूर्वक करत आहे. ‘श्रीरामाने राज्यात परत यावे’, हे सांगण्याची कृती एकच असली, तरी त्यातील हेतू भिन्न आहे. आपल्या धर्मात पाप अथवा पुण्य ही संकल्पना कृतीवर अवलंबून नसून हेतूवर अवलंबून आहे. आता जाबालिचे मत श्रीराम कसे खोडतात, ते येथे देत आहोत.

प्रभु श्रीराम म्हणतात,

‘भवान् मे प्रियकामार्थं वचनं यदिहोक्तवान् ।
अकार्यं कार्यसङ्काशमपथ्यं पथ्यसन्निभम् ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०९, श्लोक २

अर्थ : विप्रवर, आपण माझे प्रिय करण्याच्या इच्छेने येथे जी गोष्ट सांगितली, ती कर्तव्यासारखी दिसत असली, तरी वास्तविक आचरण्यायोग्य नाही. ती पथ्यासारखी दिसत असूनही वास्तविक अपथ्यकारक आहे.

तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मी चाललो, तर मी स्वेच्छाचारी होईन आणि जसे राजाचे आचरण असेल, तशीच प्रजा वागेल. (अशा मुळे राज्यात अराजक माजेल. राजा आणि प्रजा यांना न्याय अन् नैतिकता यांचा धाक हवा.)

सत्यमेवानृशंसं च राजवृत्तं सनातनम् ।
तस्मात् सत्यात्मकं राज्यं सत्ये लोकः प्रतिष्ठितः ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०९, श्लोक १०

अर्थ : ‘सत्याचे पालन’ हाच राजांचा दयाप्रधान धर्म आहे, सनातन आचार आहे; म्हणून राज्य सत्यस्वरूप आहे. सत्यामध्येच संपूर्ण लोक प्रतिष्ठित आहेत.

ऋषिमुनी, देवता या सर्वांनी सत्याचा आदर केला आहे. वेद, यज्ञ, दान, होम या सर्वांचा मूळ आधार सत्य आहे. मग मी सत्य कसे त्यागू ? मी सत्यपालनाची प्रतिज्ञा केली असल्याने आता राज्यलोभ, द्रव्याचा मोह आणि विवेकशून्य होऊन ती प्रतिज्ञा मोडणार नाही.

कायेन कुरुते पापं मनसा सम्प्रधार्य तत् ।
अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्मपातकम् ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०९, श्लोक २१

अर्थ : मनुष्य आपल्या शरिराने जे पाप करतो, त्यास प्रथम मनाच्या द्वारे कर्तव्यरूपाने निश्चित करत असतो. नंतर जिव्हेच्या साहाय्याने त्या अनृत पापकर्मास वाणीद्वारे संपन्न करत असतो. याप्रकारे एकच पातक कायिक, वाचिक आणि मानसिक भेदाने ३ प्रकारचे होत असते.

जाबालि, तुम्ही जो मला उपदेश करत आहात, तो वरवर श्रेष्ठ वाटत आहे; पण तो अयोग्य आहे; कारण ‘राजा हा सत्यप्रिय, वचनप्रिय आणि धर्माचरणी हवा. तुम्ही या सर्वांचा त्याग करून मला राज्य स्वीकार’, असे सांगत आहात.’

३ अ. प्रभु श्रीरामाने जाबालिला ‘पाखंडी व्यक्ती’ संबोधून शास्त्रसंमत दंडाविषयी सांगणे आणि जाबालिने नरमाईचे धोरण स्वीकारणे : प्रभु श्रीराम यानंतर प्रचंड क्रोधायमान झाले आणि त्यांनी जाबालिला सांगितले, ‘सत्य, धर्म, पराक्रम, सर्व प्राणिमात्रांवर दया, सर्वांशी प्रिय बोलणारा, देवता, अतिथी आणि आचारसंपन्न वेदशास्त्र निपुण ब्राह्मण यांची सेवा करणे, हा स्वर्गलोकाचा मार्ग साधूपुरुषांनी सांगितला आहे. (तोच त्याग जाबालि करण्यास सांगत आहेत.) माझ्या पित्याने तुम्हाला आपल्या पदरी ठेवले, हे त्यांचे वर्तन अयोग्य होते आणि त्याविषयी मी नापसंती व्यक्त करतो. जो व्यक्ती राजाला ‘धर्म, न्याय, सत्य आणि नीतीमत्ता यांचा त्याग करून केवळ उपभोगाकरता राज्य असते’, असे सांगतो, अशा पाखंडी व्यक्तीचा वध करणे, हेच शास्त्रसंमत आहे.’ तेव्हा जाबालिने थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले आणि प्रभु श्रीरामाला म्हटले, ‘मी आता तुझ्या समजावण्याने काही काळ आस्तिक बनलो आहे; पण नंतर पुन्हा नास्तिक होऊ शकतो !

या लेखातील आरंभीची आणि नंतरची उदाहरणे ही बालकांड अन् अयोध्याकांड यांतील असून ती केवळ वाल्मीकि रामायणातील दिली आहेत. त्यामुळे प्रभु श्रीरामाला त्याच्या गुणांमुळेच त्याला भारतीय संस्कृती ‘आदर्श नायक’ मानते. (समाप्त)

– डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
(डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे यांच्या फेसबुकवरून साभार)