प्रभु श्रीरामाचे बुद्धीकौशल्य आणि त्याने राज्य चालवण्यासाठी केलेला उपदेश

‘वाल्मीकि रामायणा’त प्रभु श्रीरामाच्या बुद्धीची साक्ष पटावी, अशी अनेकानेक उदाहरणे दिसतात. इतकेच नव्हे, तर त्याच्या चरित्रातून भरपूर शिकवण घेता येते. प्रभु श्रीरामाचे जे १६ गुण वाल्मीकींनी वर्णिले आहेत आणि पुढे जाऊन नारदांनी ७० हून अधिक गुणांचे वर्णन केले आहे; त्यापैकी एकेका गुणासाठी एकेक जन्म अपुरा पडेल. ख्यातकीर्त लोकांकडे यातील एखाद-दुसरा गुण दिसतो. तथापि सर्व गुण सापडणारा अन्य कुणी मिळत नाही. त्यांनी केलेला भरतोपदेश वाचला, तरी राज्य कसे चालवावे ? याविषयी अनेक गोष्टी लक्षात येतात. रामायणामध्ये अशा समुपदेशाच्या अनेक गोष्टी सापडतात. आपण त्यातून किती घेतो, इतकाच प्रश्न आहे.

श्रीराम

१. श्रीरामाने केलेला भरतोपदेश

कैकेयीच्या बुद्धीभेदामुळे राज्याभिषेक रहित होतो. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात जातात. दशरथाचे देहावसान होते. भरत अयोध्येत आल्यावर सर्व हकीकत कळल्यामुळे क्षुब्ध होतो आणि राज्य नाकारतो. प्रभु श्रीरामाला परत आणण्यासाठी तो चतुरंग सेना, माता, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या समवेत वनात जातो. तिथे श्रीरामाचा शोध घेऊन तो पुढे त्यांना दुःखावेगाने भेटून अयोध्येला येण्याचा आग्रह करतो. त्या वेळी प्रभु श्रीरामाने त्याला केलेला उपदेश पाहिला की, त्याचे बुद्धीकौशल्य जाणवते. त्याचप्रमाणे राज्यकर्ता कसा असायला हवा, याचे दिग्दर्शन होते.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

१ अ. प्रभु श्रीरामाने मंत्र्यांची सांगितलेली लक्षणे : भरताला श्रीराम ‘तात’ (पिता) असे संबोधून विचारतात की,

कच्चिदात्मसमाः शूराः श्रुतवन्तो जितेन्द्रियाः ।
कुलीनाश्चेङ्गितज्ञाश्च कृतास्ते तात मन्त्रिणः ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १००, श्लोक १५

अर्थ : तात, काय तू आपल्याच समान शूरवीर, शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन, तसेच बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणार्‍या सुयोग्य व्यक्तींनाच मंत्री बनवले आहेस ना ?

मन्त्रो विजयमूलं हि राज्ञां भवति राघव ।
सुसंवृतो मन्त्रिधुरैरमात्यैः शास्त्रकोविदैः ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १००, श्लोक १६

अर्थ : हे राघवा (भरता), चांगली मंत्रणा (मंत्रीगण) हेच राजे लोकांच्या विजयाचे मूळ कारण आहे. तेही जेव्हा नीतीशास्त्रनिपुण मंत्री, शिरोमणी अमात्य तिला सर्वथा गुप्त ठेवतात, तेव्हाच यशस्वी होत असते.

‘मंत्री कसे असावेत ?’, हे भरताला सुचवतांना प्रभु श्रीरामाने मंत्र्यांची लक्षणेही सांगितली आहेत. पुढे श्रीराम भरतास विचारतात, ‘तू असमयी निद्रा तर घेत नाहीस ना ? हे रघुनंदन, तुझी सल्लामसलत दोन किंवा चार कानांपुरतीच मर्यादित रहात आहे ना ? ती षट्कर्णी (अनेकांना चर्चा माहिती होणे) होत नाही ना ? कारण असे जर झाले, तर तुझे गुपित शत्रूंना कळू शकते.

बर्‍याचदा भारतातील राजकारणी आणि पत्रकार यांना या गोष्टीची जाणीव नसते. ते उघडपणे भारतीय लष्कराचे डावपेच, युद्धसज्जता वगैरे जगजाहीर करतात, जेणेकरून त्या आपसुकच शत्रूपर्यंत पोचतात. (आठवा, २६ नोव्हेंबर २००८ च्या जिहादी आक्रमणाच्या वेळी भारतीय कमांडोज हेलिकॉप्टरमधून उतरत असल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखवले. परिणामी ते पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी पाहिल्याने आक्रमणकर्त्या जिहाद्यांना ती माहिती दिली जात होती.) ‘शत्रूला नेहमीच फसवायचे असते, गाफील ठेवायचे असते’, हे आम्हाला शाळेपासून शिकवायला हवे ! याउलट ‘शत्रूने एका गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करा’, हे शिकवले जाते. रामायणातील काही उदाहरणे मुलांना शिकवली, तर शिक्षणाचे ‘भगवेकरण’ अशी ओरड चालू होते.

१ आ. श्रीरामाने भरताला राजकारण आणि सैन्य यांविषयी विचारलेली सूत्रे : राजकारणाशी संबंधित असे अनेक प्रश्न श्रीरामाने भरतास विचारले. यात गंमत अशी आहे की, बारकाईने पाहिले, तर या सर्व प्रश्नांत उत्तरही सामावलेले आहे.

कच्चित् सहस्रैर्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं महत् ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १००, श्लोक २२

अर्थ : तुम्ही सहस्रो मूर्खांच्या बदल्यात एका पंडितालाच आपल्याजवळ बाळगण्याची इच्छा ठेवता ना ? कारण विद्वान पुरुषच अर्थसंकटाच्या समयी महान कल्याण करू शकतो.

सहस्राण्यपि मूर्खाणां यद्युपास्ते महीपतिः ।
अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ।।

– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १००, श्लोक २३

अर्थ : राजाने जरी सहस्र अथवा १० सहस्र मूर्खांना आपल्याजवळ ठेवून घेतले, तरीही प्रसंग आल्यावर त्यांच्याकडून काहीही चांगले साहाय्य मिळत नाही.

महाभारतात विद्येचे ३ शत्रू कोणते यावर एक सुंदर वचन आहे. ‘अशुश्रूषा त्वरा श्लाघ्या विद्यायाः शत्रवस्त्रयः ।’ (महाभारत, पर्व ५, अध्याय ४०, श्लोक ४), म्हणजे ‘गुरुजनांची सेवा न करणे, घाई करणे आणि आत्मप्रशंसा करणे’, हे विद्येचे ३ शत्रू आहेत.

पुढे श्रीराम असे विचारतात, ‘तू शूरवीर, बुद्धीमान, कुलीन, रणकर्मदक्ष आणि तुझ्यावर प्रेम असलेल्या व्यक्तीलाच सेनापती नियुक्त केले आहेस ना ? सैनिकांचे योग्य वेतन नियमित देत आहेस ना ? अन्यथा ते राज्यावर कोपतात आणि त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. ‘सैन्य हे पोटावर चालते. त्याची काळजी घेणे’, हे राजाचे कर्तव्य असते. असे श्रीरामाने विचारलेले विविध प्रश्न विस्तारपूर्वक द्यायचे म्हटले, तर जागा अपुरी पडेल !

या प्रश्नांमागे दुसरा हेतु हा होता की, भरताने राज्य कारभार स्वीकारल्यावर जर जुन्या मंडळींना (मंत्री, सेनापती, अमात्य वगैरे) कमी करून नवीन नियुक्त्या केल्या असतील, तर त्या योग्य झाल्या आहेत का ? योग्य पदावर योग्य व्यक्तीच नियुक्त झाली कि नाही ? हे यातून जाणून घ्यायचे होते. केवळ आपला जयघोष करण्याकरता खुशमस्करे नेमले नाहीत ना ? याची खात्री करून घ्यायची होती.

१ इ. आदर्श राजा श्रीराम म्हणूनच रामराज्य लोकांच्या स्मरणात ! : श्रीराम हे अष्टावधानी होते. धर्म, वेद, शास्त्र, अर्थ, सैन्य, शस्त्रास्त्र या सर्वच विषयांमध्ये त्यांचे ज्ञान अगाध होते. राजा कसा असावा ? याचे एकमेव अद्वितीय असे उदाहरण श्रीराम होते; म्हणूनच रामराज्य हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. असेच प्रश्न महाभारतात नारदांनी युधिष्ठिरास विचारले आहेत, ‘कच्चित् प्रश्न’ या नावाने ते प्रसिद्ध  आहेत. रामाने भरतास असे क्षेमकुशल प्रश्न विचारून भरताचा एक प्रकारे राजनीतीचा अभ्यास घेतला होता.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.

(डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे यांच्या फेसबुकवरून साभार)

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म, देवता अन् राष्ट्र यांचा द्वेष करणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी सरकारने विडंबनविरोधी कठोर कायदा करणे आवश्यक !