केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित संस्थेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद

‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप

पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय्.ने) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित पणजीस्थित ‘गॅरिसन इंजिनीयरिंग’ या ‘मिलिट्री इंजिनीयरिंग सर्व्हीसीस’चे (एम्.ई.एस्.) ३ अधिकारी, तसेच झुआरीनगर येथील ‘लकी जनरल इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स’ या खासगी आस्थापनाचे मालक यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय्.आर्.) नोंदवला आहे. ‘एम्.ई.एस्.’ला निकृष्ट दर्जाचे लाकडी सामान (‘फर्निचर’) पुरवल्याच्या प्रकरणी कटकारस्थान करणे, फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे आणि भ्रष्टाचार करणे, या आरोपांवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी ‘सी.बी.आय्.’ने मार्च २०२२ मध्ये ‘लकी जनरल इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स’ आणि पणजीस्थित ‘गॅरिसन इंजिनीयरिंग’ ही मिलिट्री इंजिनीयरिंग सर्व्हीसीस या आस्थापनांच्या विरोधात प्राथमिक अन्वेषणाला प्रारंभ केला. या प्रकरणी ‘गॅरिसन इंजिनीयरिंग’ यांनी वर्ष २०१८ ते २०२१ या कालावधीत अंदाजे ८० ते ९० लाख रुपये संबंधित कंत्राटदाराला दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ‘गॅरिसन इंजिनीयरिंग’ एम्.ई.एस्.’चे ‘बराक स्टोअर ऑफिसर’ महेंद्र कुमार मकवाना, कनिष्ठ अभियंता राजेश गोपाल कृष्णन् आणि साहाय्यक अभियंता अधेश्वर कुमार गुप्ता हे ३ अधिकारी, तसेच ‘लकी जनरल इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स’चे मालक सुरजित सिंह यांच्या विरोधात ‘एफ्.आय्.आर्.’ नोंदवण्यात आला आहे. वर्ष २०१९ मध्ये संशयित सुरजित सिंह यांनी कंत्राटातील नियमाचे उल्लंघन करून तिसर्‍या आस्थापनाकडून ‘रेडिमेड’ निकृष्ट दर्जाचे ‘फर्निचर’ खरेदी करून ते ‘गॅरिसन इंजिनीयरिंग’ या मिलिट्री इंजिनीयरिंग सर्व्हीसीसला पुरवले.