हरियाणातील राखी गढी येथे साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह सापडले !

पुरातत्व विभाग आणि डेक्कन महाविद्यालयातील संशोधकांचे यश !

पुणे – हरियाणातील राखी गढी येथे हडप्पा संस्कृतीतील सर्वांत पुरातन वसाहतीच्या उत्खननाला मोठे यश आले आहे. साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह मातीच्या लोट्यासह (तांब्यासह) सापडले आहे. या ठिकाणी तेवढाच जुना मानवी सांगाडाही मिळाला आहे. एका खोल खंदकामध्ये ६ मीटर खोदल्यानंतर मातीची भांडी सापडली आहेत. पाणी साठवण्याच्या डब्यात अजूनही एक लोटा जसाच्या तसा सापडला आहे. राखी गढी येथे गेल्या काही वर्षांपासून ‘भारतीय पुरातत्व विभाग, नवी देहली’ आणि पुणे येथील ‘डेक्कन महाविद्यालयातील संशोधक’ काम करत आहेत.

प्रारंभीच्या खोदकामात हडप्पा काळातील बहुमजली इमारतींचे अवशेष सापडले. अजूनही मोठमोठे ढिगारे शेष आहेत. पुरातत्व विभागाचे प्रमुख संजय मंजुळ आणि त्यांच्या पथकाला दोन्ही बाजूंनी मैदानाचे (स्टेडियमचे) पुरावे सापडले आहेत. वेशीजवळ टेराकोटा चेंडूचे (बॉलचे) ढीग सापडले आहेत, हे हल्लेखोरांविरोधात गोफणासाठी वापरले होते का ? यावर संशोधन चालू आहे.