चंद्रपूर – जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याने अनुमाने १५० जणांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माजरी येथे १३ एप्रिल या दिवशी नवसाची पूजा ठेवण्यात आली होती. पूजेनिमित्त रात्री गावात जेवण ठेवण्यात आले होते. या पूजेत आणि जेवणात अनुमाने ५०० जण सहभागी झाले होते. गावकरी जेवण करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. अनुमाने १०० जणांना असा त्रास झाला. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे समजले. त्यानंतर विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत गेली.
गावातील आणि जवळील रुग्णालयांत जागा नसल्याने अनेकांना भद्रावती अन् वरोरा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाची अनुमती घ्यावी लागते. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर म्हणाले की, जेवण बनवण्यापूर्वी कोणतीही अनुमती घेतलेली नव्हती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर विषबाधा होण्यामागचे कारण स्पष्ट होईल.