२५ वर्षे… संघर्षात अनुभवलेल्या अखंड गुरुकृपेची !

वर्धापनदिनाच्या निमित्ताने पूजा होणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’ हे आमच्या गुरूंचे रूप असल्यामुळे गुरुपौर्णिमेइतकाच आमच्यासाठी ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिनही महत्त्वाचा असतो. या दिवशी दैनिक कार्यालयात ‘सनातन प्रभात’च्या अंकाची पूजा केली जाते. जगभरातील बहुदा सर्वच वर्तमानपत्रे त्या वर्तमानपत्राचा वर्धापन सोहळा साजरा करतात; मात्र असे कुठले वर्तमानपत्र आहे, ज्याची वर्धापनदिनाच्या निमित्ताने पूजा केली जाते ?

दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्यासाठी देवच आहे. त्याला नियमितपणे शब्दफुले अर्पण करून त्याची पूजा करणे, हीच आमची साधना आहे ! मागील २५ वर्षे ही शब्दपूजा देवाने आमच्याकडून अखंडपणे करून घेतली, ही त्याची आमच्यावर असलेली कृपाच होय !


दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होऊन २५ वर्षे पूर्ण होत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून ‘सनातन प्रभात’च्या घोडदौडीचे साक्षीदार असणारे बरेच साधक आजही पत्रकार म्हणून, कुणी संपादकीय विभागात, तर कुणी वितरण विभागात सेवा करत आहेत. या सर्वांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज ‘डिजिटल’ युग आहे. त्या अनुषंगाने ‘सनातन प्रभात’ही कात टाकत आहे. २५ वर्षांत ‘सनातन प्रभात’ची झालेली जडणघडण ही केवळ बाह्य अंगाने दैनिकाची नाही, तर ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत असलेल्या साधकांचीही आहे. २५ वर्षांचा हा प्रवास संघर्षमय होता; मात्र ‘सनातन प्रभात’च्या साधकांवर असलेल्या अखंड गुरुकृपेमुळे हा प्रवास आनंददायी झाला !

आजचा दिवस सिंहावलोकनाचा ! पुढील ध्येय-धोरणे निश्चितकरण्याचा ! याचप्रमाणे आजचा दिवस हा परम पूज्यांप्रति (सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति) कृतज्ञता व्यक्त करण्याचा अन् त्यांची दैनिकावर असणारी अपार प्रीती अनुभवण्याचाही आहे. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजामध्ये हिंदुतेज जागवणार्‍या आणि समाजातील लोकांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीप्रवण करणार्‍या गुरुदेवांप्रति ही शब्दसुमनांजली…!

१. ‘सनातन प्रभात’ची निर्मिती आणि कार्य हा चमत्कारच !

सौ. समीक्षा गाडे

एखादे वृत्तपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्यासह पत्रकारिता क्षेत्रात गाठीशी अनुभव असणार्‍या लोकांची फौज लागते. ‘सनातन प्रभात’कडे यांपैकी काय होते ? ना आर्थिक बळ, ना कुशल मनुष्यबळ ! वार्ताहर ते वितरण, विज्ञापने या विभागात सेवा करणारे साधक हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून पूर्णकालीन झालेले साधक होते. असे असतांनाही हिंदु राष्ट्राची स्थापना या उच्चतम ध्येयाने प्रेरित होऊन ‘सनातन प्रभात’ने त्या दिशेने मार्गक्रमण करणे, हे गुरुकृपेनेच शक्य आहे. ध्येय जरी निश्चित असले, तरी ध्येयपूर्तीसाठी लागणारे दिशादर्शन, त्यासाठी आवश्यक शिस्तबद्धता आणि आध्यात्मिक बळ यांसाठी गुरुकृपाच लागते. साधकांच्या गाठीशी कोणताही व्यवहारिक अनुभव नसतांना परमपूज्यांच्या संकल्पाने ‘सनातन प्रभात’चे कार्य चालू होते, आहे अन् भविष्यात राहीलही !

१ अ. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चमत्कार बघायचे असतील, तर त्यांनी सनातन प्रभातच्या दैवी कार्याचा आढावा घ्यावा ! : ९० च्या दशकात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना किंवा धर्मजागृती यांविषयी उघडपणे बोलणे’, हा गुन्हा समजला जायचा. आज जवळजवळ सर्वच प्रसारमाध्यमे हिंदुत्वाची बाजू उचलून धरतांना दिसत आहेत; मात्र त्या काळची सामाजिक परिस्थिती पहाता राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी वृत्तपत्र काढणे आणि ते २५ वर्षे अविरतपणे चालू ठेवणे, हा चमत्कार नव्हे का ? हा चमत्कार शक्य झाला, तो दैनिकात सेवा करणार्‍या साधकांवर असलेल्या अखंड गुरुकृपेमुळे ! ‘चमत्कार दाखवा आणि ५ लाख रुपये मिळवा’, अशी बालीश आव्हाने बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले यांच्याकडून दिली जातात. अशांचा वैचारिक समाचार घेणारे ‘सनातन प्रभात’ वृत्तपत्र २५ वर्षे विविध आव्हानांना तोंड देत चालू रहाणे’, हाच मोठा चमत्कार आहे, हे आमच्या विरोधकांना आज आम्ही सांगू इच्छितो.

२. ‘सनातन प्रभात’ नसे केवळ वृत्तपत्र । ते असे पितृतुल्य छत्र ।।

‘सनातन प्रभात’ आणि त्या विभागात सेवा करणारे साधक यांच्यात अतूट नाते आहे. ‘सनातन प्रभात’ आम्हाला शिकवतो, घडवतो, चुका दाखवतो अन् साधनेतील पुढील मार्गदर्शनही करतो. तो आमच्यासाठी निवळ ८ किंवा १० पानी कागदाचा अंक नाही, तो जिवंत आहे ! तो भव्य, चैतन्यदायी आणि प्रकाशमान आहे. तो आमचा पिता आहे आणि आम्ही त्याची लेकरे आहोत. पाल्यावर सुसंस्कार करून त्याला प्रगल्भ, विवेकी करून आणि त्याचे दोष निर्मूलन करून त्याला सर्वांगाने विकसित करण्याचे काम पित्याचे असते. त्याप्रमाणे ‘सनातन प्रभात’ आम्हा पामरांना घडवत आहे.

३. दैनिक विभागातील साधकांची होत असलेली वैचारिक शुद्धी !

‘दैनिकात रज-तमात्मक बातम्या असतात. सातत्याने त्याचेच विचार किंवा त्या संदर्भात लेख किंवा चौकटी कराव्या लागतात. ‘दिवसातील १०-१२ घंटे त्याच वातावरणामध्ये राहून त्याचा परिणाम साधनेवर होतो का ?’, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. जरी स्थुलातून रज-तमात्मक विषय दिसत असले, तरी त्यामागील विचार हा उदात्त आणि सात्त्विक असल्यामुळे साधकांना त्याचा त्रास न होता ती सेवा आनंददायीच होते. ‘अपुर्‍या मनुष्यबळातही दैनिकाची नियमित सेवा निर्विघ्नपणे पार पडणे’, ‘बातमी किंवा लेख यांविषयी नवनवीन दृष्टीकोन सुचणे’, अशा अनुभूती साधक नेहमीच घेत असतात. ‘ईश्वराच्या संकल्पाने चालू झालेले कार्य ईश्वरच पूर्ण करून देतो’, याची प्रचीती दैनिक विभागातील साधक प्रतिदिन घेत आहेत.

३ अ. शब्दशक्तीद्वारे कार्य करण्यासाठी ईश्वराने दैनिक विभागातील साधकांना निवडणे, ही गुरुकृपा ! : ईश्वराच्या शब्दशक्तीद्वारे ‘सनातन प्रभात’चे कार्य चालू आहे. यासाठी माध्यम म्हणून दैनिक विभागातील साधकांना निवडले, ही आमच्यावर असलेली केवढी मोठी गुरुकृपा ! ईश्वराचा शुद्ध आणि दैवी विचार शब्दरूपाद्वारे समाजापर्यंत पोचवणे, हे दायित्व मोठे आहे. ते साधकांकडून चोखपणे पार पाडण्यासाठी परम पूज्य डॉक्टर साधकांची अखंडपणे वैचारिक शुद्धी करून त्यांना या दायित्वासाठी सिद्ध करत आहेत.

‘या २५ वर्षांच्या प्रवासात देवाने आम्हा साधकांना भरभरून दिले, आम्हा साधकांचे जीवन उजळले आणि मानसिक, बौद्धिक अन् त्याहून अधिक आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध केले. ही कृतज्ञतेची जाणीव आम्हा साधकांच्या मनात सातत्याने जागृत राहो’, हीच या शुभदिनी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !

– सौ. समीक्षा गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२४)