दैनिकाच्या सेवेतून साधकामध्ये गुणवृद्धी करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे माजी समूह संपादक डॉ. दुर्गेश सामंत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये अध्यात्मप्रसार, राष्ट्र आणि धर्म जागृती यांविषयक त्यांच्या कार्याचा विस्तार साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून पत्रकारितेद्वारे केला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रारंभी स्वतः वर्ष १९९८ मध्ये चालू झालेले साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि वर्ष १९९९ मध्ये चालू झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या, तसेच हिंदी आणि इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’ यांचे समूह संपादक होते.’ या कालावधीत मी (डॉ. दुर्गेश सामंत) संपादकीय विभागात सेवा करायचो. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून मला शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

प. पू. डॉ. आठवले यांना बातमीतील दृष्टीकोन दाखवतांना डॉ. दुर्गेश सामंत

१. आवश्यक तेवढेच जमा करायला शिकवणे !

डॉ. दुर्गेश सामंत

वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. त्या वेळी मी माझ्या घरी सांगली येथे होतो. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये काही विषयांवर मी लिखाण करू लागलो. ‘देश, समाज आदी विषयांवर लेख लिहायचे, तर काही योग्य संदर्भ माहिती आपल्याकडे असायला हवी’, असे वाटल्याने मी माझ्याकडे येणारे वर्तमानपत्र वाचून त्यात कोणत्या विषयावर उपयुक्त लिखाण आहे ? हे पाहून त्या त्या पानावर संबंधित खुणा करून ते ते दैनिक साठवू लागलो. काही काळाने प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याशी दूरभाषवर बोलतांना मी त्यांना हे सूत्र सांगितले. त्यांनी त्याच वेळी मला सांगितले, ‘‘आवश्यक तेवढेच कात्रण कापून ठेवावे. उगाच वर्तमानपत्राची पाने कशाला साठवता ?’’ त्या वेळची माझी आकलन क्षमता, माझ्यातील अहंकार, आळस आदी कारणांमुळे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करू शकलो नाही. नंतर सांगली सोडतांना अर्थातच ही सर्व वर्तमानपत्रे रद्दीत जमा झाली. नंतर पुढे प.पू. डॉक्टरांसमवेत प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळाली, त्या वेळी ‘ते नेमके कसे करतात ?’, हे शिकायला मिळाले. अर्थात् यातून ‘आवश्यक तेवढेच जमा करावे’, ही शिकवण मात्र जीवनातील अन्य पैलूंच्या संबंधाने उपयोगी पडली.

२. अल्प वेळामध्ये अन्य वर्तमानपत्रे वाचून त्यातील निवडक लिखाणावर खुणा करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

नंतर वर्ष १९९९ मध्ये गोव्यातून दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. प्रारंभी गोव्यातील सर्व स्थानिक मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे संपादकीय विभागात मागवली जात असत. अल्पावधीतच इंग्रजी वर्तमानपत्रे प.पू. डॉक्टरांनी बंद करायला सांगितली. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने (जाहिराती) घेण्याची सेवा करणार्‍या साधकांना इंग्रजी वर्तमानपत्रे हवी होती, ती तेवढी काही काळ चालू राहिली. प.पू. डॉक्टर त्या काळात सर्व वर्तमानपत्रे वाचत असत आणि त्यांवर काही खुणा करत असत. त्यातून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

प.पू. डॉक्टर वर्तमानपत्रे वाचतांना पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचे सर्व लिखाण वाचत आणि त्यांना उपयुक्त वाटणार्‍या लिखाणावर खुणा करत असत. प्रत्येक खुणेवर ‘ती कशासाठी आहे ?’ हे चिन्हांकित केलेले (नोंद केलेले) असे. उदाहरणार्थ ‘भटक्या कुत्र्याने लहान मुलाचा चावा घेतला’, ही बातमी असेल, तर त्या बातमीला खूण केलेली असे आणि तेथेच कोपर्‍यात ‘भटकी कुत्री’, असा विषय लिहिलेला असे. या खुणांसंबंधी केलेल्या उल्लेखांवरून आणि चिन्हांकित केलेल्या लिखाणावरून ‘प.पू. डॉक्टर एकाच वेळी विविध विषयांकडे किती व्यापक दृष्टीने पहात आहेत’, हे समजले आणि त्यातून ‘आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा ठरवले, तर किती व्यापक, विविध दृष्टीकोनांतून त्याच्याकडे पहायला हवे’, हे शिकायला मिळाले. सर्वांत विशेष म्हणजे ५-६ वर्तमानपत्रे ते अगदी अल्पावधीत म्हणजे १५ ते २० मिनिटांत वाचून खुणा पूर्ण करत असत. जणू ‘कोणत्या पानावरील काय वाचावे ?’, हे त्यांना आपसूकच आणि त्यातील २ ते ४ वाक्ये वाचताच लक्षात येत असावे. अशा रितीने ‘समाज’, ‘रस्ते’, ‘संशोधन’, ‘अध्यात्म’, ‘धर्म’, ‘युद्ध’, ‘स्त्री’, अशा विविध एक शब्दीय नोंदींनी युक्त कात्रणे कापून त्यांचे वर्गीकरण करून ती पुढे सांभाळण्यात आली. त्या लिखाणाचा वापर नंतर विविध विषयांवरील ग्रंथनिर्मितीच्या वेळी झाला.

३. ‘साधकाला उपयोगी ठरू शकेल’, असे अन्य वर्तमानपत्रांतील एखादे वृत्त त्याच्या नावाने नोंद करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर !

एखादे लिखाण अथवा त्यातील सूत्र एखाद्या साधकाला सांगायचे असेल, तर त्या साधकाच्या नावे ते चिन्हांकित (त्यावर नोंद) केलेले असे. एकदा सांगली येथील ज्येष्ठ वैद्यांचे निधन झाले. ती बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या अगदी आतल्या पानावर ६ ते ८ ओळींची होती. तिला चिन्हांकित करून त्यावर प.पू. डॉक्टरांनी ‘दुर्गेश’ (डॉ. दुर्गेश सामंत) असे लिहिले होते. त्यावरून मला ‘मला शिकवणार्‍या त्या शिक्षकांचे निधन झाले आहे’, असे समजले आणि मी मग त्यांच्या नातेवाइकांना शोकसंदेश पाठवला. अर्थात् काही सूत्रे शिकण्यासाठीही साधकाच्या नावे चिन्हांकित (नोंद) केलेली असत. काही वेळा अन्य वर्तमानपत्रांनी मुख्य केलेली बातमी आणि आपल्या दैनिकातील मुख्य बातमी, यांचीही तुलना करून ‘आपले कुठे चुकले ?’ ते शोधायला सांगत.

४. बातम्यांवर संपादकीय दृष्टीकोन देण्यास शिकवून विचार विकसित होण्यास चालना देणे !

अन्य वर्तमानपत्रांतील काही बातम्यांवर प.पू. डॉक्टरांनी एखाद्या वाक्यात स्वतःचे दृष्टीकोन लिहिलेले असत. मग ते दृष्टीकोन समजून घेऊन संपादकीय विभागातील एखादा साधक  दृष्टीकोनाच्या चौकटी बनवत असे.  त्या परत प.पू. डॉक्टरांना पडताळायला ठेवल्या जात असत. त्यांनी सुधारणा केल्या की, मग दुसर्‍या दिवशी त्या चौकटी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापल्या जात. त्यातून साधकांना आणि वाचकांना ‘बातम्यांकडे कसे पहायचे ?’, हे शिकायला मिळाले. काही कालावधीनंतर त्यांनी बातम्यांवर काहीच न लिहिता नुसत्या खुणा करून पाठवायला प्रारंभ केला. मग ‘त्यात कोणता दृष्टीकोन अभिप्रेत असावा ?’, हा विचार करून संपादकीय विभागातील संबंधित साधक चौकट सिद्ध करत असे. नंतर ती चौकट पडताळायला प.पू. डॉक्टरांकडे पाठवत असे. यातून शिकण्याची पुढची प्रक्रिया झाली. नंतर त्यांनी ‘दैनिकात प्रसिद्ध करण्यापूर्वी माझ्याकडे पडताळण्यासाठी चौकटी पाठवू नका’, असे सांगितले. त्या चौकटी दुसर्‍या दिवशी ते दैनिकात वाचत असत. यातून वर्तमानपत्रांतील लिखाणांतून समस्या कशा शोधायच्या ? त्यावर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने नेमके कोणते विचार मांडायचे ? याची दिशा मिळाली. आम्हीही अशा रितीने अन्य वर्तमानपत्रे, तसेच आपले दैनिक (दैनिक ‘सनातन प्रभात’) वाचून वरील प्रकारे चौकटी बनवाव्या, यासाठी प.पू. डॉक्टरांनी प्रोत्साहन दिले. यातून विचार विकसित होण्यास चालना मिळाली.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रच नव्हे, तर अन्य कोणतेही वाचन करतांना ते छान वाटते म्हणून किंवा ‘केवळ करमणूक म्हणून वाचणे; म्हणजे वेळ वाया घालवणे आहे, हे समजले. तसेच वाचता वाचता त्यातील चांगले काही आढळले, तर त्याची काहीतरी नोंद करायची सवय लागली.

५. ‘सेवांत नेमकी कुठे सुधारणा करायला हवी’, हे सांगतांना विशेष आध्यात्मिक दृष्टीकोन देणे !

५ अ. सेवा सुरळीत न होण्यामागील कारण न कळणे ! : दोनापावला येथे सर्वच नव्याने चालू झाले होते. दैनिक प्रतिदिन वेळेवर पूर्ण होणे, हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अवघड बनायचे. सेवाकेंद्रात अन्य क्षेत्रांतील सेवा वेळेवर होण्यातही समस्या होत्या. ‘तांत्रिक अडचण आली नाही आणि सेवा सुरळीत झाल्या’, असा एखादाच दिवस गेला असेल. बरं, आम्ही सर्वच साधक दैनिकाशी निगडित सर्वच गोष्टींविषयी अज्ञानी किंवा आवश्यकतेपेक्षा एकचतुर्थांश ज्ञानी होतो. दैनिकातील सर्व उपविभागांतील साधकांच्या सेवा एकमेकांवर अवलंबून होत्या. स्वाभाविकतः प्रत्येकाला ‘आपल्या आधीच्या उपविभागामुळे आपल्याला समस्या निर्माण होत आहेत’, असे वाटत असे. पानांची रचना करणारे (फॉर्मेटर) आणि संपादकीय संस्करण करणारे यांच्यातील मतभेद ही जणू नित्याची गोष्ट होती. एकूण सर्व दायित्व माझ्यावर असल्याने ‘कशामुळे ? काय ? कुठे चुकत आहे ? आणि नेमकी कुठे अन् कोणती उपाययोजना केली, तर सर्व थोडेतरी सुरळीत होईल’, हे मला कळत नसे. प.पू. डॉक्टर प्रतिदिन दैनिकावर खुणा करून १० – १५ चुका दाखवून देत असत. त्यामुळे माझा जीव हैराण होऊन गेला होता.

५ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘नेमके कुठे चुकत आहे’, ते सांगणे आणि त्यामागील उमगलेला आध्यात्मिक दृष्टीकोन ! : मी मग प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘नेमके कुठे चुकत आहे ? कुठे सुधारणा करायला हवी ?’’ त्यांनी मी आणि संपादकीय विभागातील अन्य साधक जेथे बैठकीसाठी बसत असू, त्या पटलाकडे बोट दाखवून म्हटले, ‘‘तेथे सुधारणा व्हायला हवी !’’ मला आश्चर्य वाटले. ‘अन्य उपविभागांच्या संदर्भातही सांगतील’, अशी मला अपेक्षा होती. मग मी विचारले, ‘‘तुम्हाला कसे कळले ?’’ त्यांनी म्हटले, ‘‘मी यांत गुंतलेला नाही म्हणून !’’ या वाक्याचा कार्यसापेक्ष व्यावहारिक अर्थ आणि त्यामागील विचारधारा लगेच समजली. त्यानुरूप आम्ही कृतीपण आरंभ केली; परंतु यामागे असलेला आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन त्याहून पुष्कळ अधिक महत्त्वाचा आहे, हे लक्षात आले. मला उमगलेला दृष्टीकोन असा. ‘गुंतूनी गुंत्यात पाय माझा मोकळा’ या प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) वचनानुसार प.पू. डॉक्टर या मायेत नाहीत. त्यामुळे त्यांना कुठे ? काय ? आणि कितपत दुरुस्ती करायला हवी ? हे चांगले समजते. जसे मायेत न गुंतलेल्याला सत्याचे ज्ञान झालेले असते; म्हणून तो ज्ञानी मायेत गुरफटून गेलेल्यांना नेमकी वाट दाखवू शकतो, तसेच काहीसे हे आहे. संसारात गुंतलेल्याला त्याच्यातील दोष, अहं आदींमुळे ‘नेमके कसे पुढे जावे ?’, हे समजत नसते, हे माझ्या लक्षात आले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने प.पू. डॉ. आठवले यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून त्यांनी जे शिकवले ते येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ संपादक म्हणूनच नव्हे, तर एक साधक म्हणून प.पू. डॉ. आठवले यांनी मला घडवले, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

– डॉ. दुर्गेश सामंत, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे माजी समूह संपादक


‘कार्यालयाला भेट दिलेल्या अन्य वृत्तपत्राच्या संपादकांना नेमके काय सांगायचे ?’, या संदर्भात दिलेला विशेष दृष्टीकोन !

शुद्धलेखनाचा सराव करतांना तत्कालीन साधक ! (वर्ष १९९९)

एकदा एका प्रतष्ठित मराठी दैनिकाचे संपादक आमच्या कार्यालयात आले. ते येण्याआधी त्यांना नेहमीप्रमाणे सनातन संस्थेचे कार्य आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय दाखवण्यासमवेत आणखी काय दाखवू किंवा सांगू ? असे मी प.पू. डॉक्टरांना विचारायला गेलो. त्यांनी सांगितले, ‘‘आपण आपल्या दैनिकातील शुद्धलेखन चांगले असावे, यासाठी काय करतो ? ते त्यांना सांगा. त्याचप्रमाणे त्यांच्याच वर्तमानपत्रात अगदी आतल्या पानावर एक स्तंभाचीसुद्धा तशी फार अल्प महत्त्वाची वाटणारी बातमी वाचून,  यावर आपले विचार आपण आपल्या दैनिकात मांडतो, हे दाखवा.’’ ते संपादक कार्यालयात आल्यावर त्यांना मी सर्व कार्यालय दाखवले आणि नंतर वरील दोन सूत्रे सांगितली. शुद्धलेखनाच्या संदर्भात माहिती ऐकून ते संपादक म्हणाले, ‘‘हे विशेष आहे. आजकाल शुद्धलेखन म्हणजे काय ? हे दैनिक कार्यालयातील बर्‍याच जणांना ठाऊकच नसते.’’ ‘त्यांच्या वर्तमानपत्रातील छोट्याशा बातमीवरसुद्धा आम्ही कशा प्रकारे दृष्टीकोन देतो’, हे पाहून त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले. यातून मला ‘आपल्याकडे कुणी येते, तर त्यांना नेमके विशेषत्वाने काय दाखवायचे अथवा सांगायचे ?’, हा एक पैलू शिकायला मिळाला.