दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परखड बातम्या हिंदूंना जागृत करती !
‘सनातन प्रभात’ हे दैनिक हिंदुत्वनिष्ठांना दिशा देणारा ‘धर्मग्रंथच’ !
अ. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेविषयी दृष्टीकोन समजणे ! : कोल्हापूर येथे काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाच्या प्रक्रियेला विरोध करावा कि करू नये ?, नेमका धर्मशास्त्रीय दृष्टीकोन काय असावा ? याविषयी हिंदुत्वनिष्ठांमध्ये संभ्रम होता. मी एका हिंदुत्वनिष्ठांना भेटायला गेलो असता त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. ते मला म्हणाले, ‘‘माझ्या मनात रासायनिक लेपनाविषयी मनामध्ये संभ्रम असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘रासायनिक लेपन प्रक्रिया किंवा दुभंगलेली मूर्ती पालटावी कि पालटू नये ?’ या संदर्भात योग्य दृष्टीकोन समजला आणि माझा संभ्रम दूर झाला. त्यामुळे रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध करण्याची आमची दिशा अन् भूमिका स्पष्ट झाली.’’ अशा विविध प्रकरणांत ‘धर्मशास्त्रीय दृष्टीकोनांतून नेमकी भूमिका काय असावी ?’, हे सांगणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे हिंदुत्वनिष्ठांना दिशा देणारा ‘धर्मग्रंथच’ आहे.
‘सनातन प्रभात’मधील विषयांमुळे आंदोलन आणि चळवळ यांना प्रारंभ !
हिंदु जनजागृती समितीचे कार्य चालू झाल्यानंतर ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची नग्न अन् अश्लील चित्रे काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांमधून ‘त्यांच्या चित्रांची प्रदर्शने लागणार आहेत’, ही माहिती समितीला मिळाली. त्यामुळे एम्.एफ्. हुसेन यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलने झाली. भारतभरामध्ये १ सहस्र २५० हून अधिक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आणि हुसेन यांना भारतातून पळून जावे लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील चळवळ ही ‘सनातन प्रभात’च्या वृत्तांमुळे वाढत गेली, हे मान्य करावे लागेल. त्यानंतरही अनेक धर्महानीच्या घटनांविषयी ‘सनातन प्रभात’मधूनच समाजाला माहिती मिळाली. अजूनही विविध माध्यमातून हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींची विटंबना करणार्या घटना चित्रपट, विज्ञापने, चित्रे यांच्या माध्यमातून होत असतात. या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ तत्परतेने आवाज उठवते.
दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे हिंदूंचा दबावगट सिद्ध होणे !
काही वर्षांपूर्वी कान्हादेशात (खानदेशमधील) अनेक ठिकाणी अवैध पशूवधगृहे चालू होती. तेथील पांडववाडा या पांडवकालीन वास्तूवर धर्मांधांनी अवैधरित्या अतिक्रमण केले होते. या संदर्भात जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये वाचा फोडण्यात आली आणि आंदोलन घोषित करण्यात आले. या विषयाला ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाने मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचवले. त्यासाठी दैनिकाचा विशेषांक काढण्यात आला. या चळवळीतून लक्षात आले की, पांडववाडासारखा एरंडोल, जळगाव येथील विषय किंवा एखाद्या पशूवधगृहाच्या संदर्भातील विषय स्थानिक स्तरापुरताच मर्यादित ठेवला, तर तो आघात थांबत नाही; परंतु मोठ्या प्रमाणावर हा विषय सर्वांपर्यंत पोचवल्यास ती समस्या सर्वांना समजते आणि अनेक संघटनांचा पाठिंबा प्राप्त होतो. हिंदूंचा व्यापक दबावगट सिद्ध होण्यास साहाय्य होते. ‘सनातन प्रभात’मधील पांडववाडा येथील वृत्ताची नोंद नाशिक येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने घेतली आणि ‘हे आंदोलन का उभे राहिले ?’, याची चौकशी होऊन हिंदूंची भूमिका शासनापर्यंत पोचवण्यात आली.
शिवछत्रपतींच्या गड-दुर्गांवर झालेल्या इस्लामी अतिक्रमणाला वाचा फोडल्याने शासनाकडून तात्काळ कारवाई
विशाळगडावरील रेहान बाबांचा दर्गा, लोहगडावरील अवैध मशीद, रायगडावरील मदार माचीचे मशिदीत झालेले रूपांतर, मलंगगड आणि दुर्गाडीवरील अतिक्रमण या सर्वांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून परखडपणे वाचा फोडण्यात आली. विविध वृत्तांमधून इस्लामी अतिक्रमणाचा विषय लोकांपर्यंत पोचवला गेला आणि त्यानंतर त्वरित प्रशासनाने त्याची नोंद घेतली. परिणामी विशाळगड, मुंबईतील माहीमच्या गड, राजगुरुनगर (जिल्हा पुणे) जवळील संग्रामगड यांवर झालेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश शासनाने दिले आणि ती अतिक्रमणे काढण्यातही आली.
‘सनातन प्रभात’ हे सत्यनिष्ठेसाठी आशेचा किरण !
हिंदुत्वाच्या कार्यामुळे विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, अधिवक्ते, मंदिर विश्वस्त, उद्योजक यांच्याशी संपर्क येतो. अकोला येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक चालू असतांना एक हिंदुत्वनिष्ठ म्हणाले, ‘‘आमच्या घरी अन्य २ वर्तमानपत्रेही येतात; परंतु आम्हाला एखाद्या गोष्टीची वस्तूनिष्ठता आणि सत्यता पडताळायची असेल, तर या विषयाची बातमी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नेमकी काय आलेली आहे ? हे आम्ही पहातो. मगच आमची भूमिका ठरवतो; कारण ‘सनातन प्रभात’ हे सत्याचा आधार आहे आणि सत्यनिष्ठेवर चालणारे दैनिक आहे. आधुनिक काळातील राजा हरिश्चंद्रांसारखी भूमिका बजावणारे वृत्तपत्र हे ‘सनातन प्रभात’च आहे. म्हणून आम्हाला ‘सनातन प्रभात’विषयी पुष्कळ आदर आणि विश्वास आहे.’’
हिंदुत्वाविषयीची आंदोलने, मोर्चे यांना प्रसिद्धी देण्यात अग्रेसर असलेले ‘सनातन प्रभात’ !
काही दिवसांपूर्वी पुणे येथे मंदिरांच्या संदर्भातील पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकार संघात गेलो होतो. आम्ही घेणार असलेल्या पत्रकार परिषदेच्या पूर्वी एक मोतीचूर लाडू बनवणारे आस्थापन त्यांचा विषय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेत होते. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांनी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे आढळले. अर्थात् ‘या पाठीमागे ‘पेड न्यूज’ (पैसे देऊन वृत्त प्रसिद्ध करणे) निश्चितपणे असू शकते’, असा विचार माझ्या मनात आला. या वेळी विचार आला की, मोतीचूर लाडवाला व्यापक स्तरावर प्रसिद्धी मिळू शकते; पण ‘हिंदुत्वनिष्ठ संघटना राबवत असलेल्या अभियानाला मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य कोण करत असेल ?’, तर ते आहे ‘सनातन प्रभात’ ! हिंदुत्वनिष्ठ राबवत असलेले उपक्रम, आंदोलने, मोर्चे, विविध ठिकाणी देण्यात येणारी निवेदने, पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात येणार्या तक्रारी यांना, त्याचप्रमाणे ‘लव्ह जिहाद’, ‘भूमी जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’ अशा विविध घटनांची वृत्ते वस्तूनिष्ठ, सत्यनिष्ठ आणि वास्तव रूपात लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. त्यामुळे आज हिंदुत्वाच्या कार्याला आणि चळवळींना प्रसिद्धी देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ एक आधारवड बनले आहे.
केवळ बातम्या न देता चळवळ उभी करणारे वृत्तपत्र !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाल्यानंतर ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी म्हटले होते, ‘‘दैनिक सनातन प्रभात’, हे केवळ बातम्या प्रसिद्ध करणारे नव्हे, तर चळवळ उभी करणारे दैनिक असेल.’’ त्याची प्रचीती पुढील उदाहरणावरून आली.
वर्ष २००८ मध्ये तळेगाव (जिल्हा पुणे) येथील नव्याने गोरक्षणाचे कार्य करणार्या काही गोरक्षकांनी गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. अवैध वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगितले; परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी टाळाटाळ केली. अन्य प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत हा विषय पोचवण्याचा प्रयत्न केला; मात्र अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणार्या माध्यमांनी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. शेवटी गोरक्षकांनी ‘सनातन प्रभात’शी संपर्क साधून या विषयाच्या संदर्भात वृत्त दिले आणि ते प्रसिद्ध झाले. गोरक्षणाचे वृत्त असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ५ सहस्र प्रती गोरक्षकांनी तळेगाव परिसरातील विविध गावांमध्ये वाटल्या. याच्या परिणामस्वरूप अनेक गावांतील गोरक्षकच नव्हे, तर सर्वसामान्य हिंदूंनीही एकत्र येऊन पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि संबंधित कसायांवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले. ‘सनातन प्रभात’च्या एका वृत्ताचा परिणाम कसा होतो ?’, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हिंदु राष्ट्र-जागृती सभांना व्यापक प्रसिद्धी मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी सभांची मागणी येणे !
वर्ष २००८ पासून समाजातील हिंदु राष्ट्राचा जागर करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येते. या सभांना ‘सनातन प्रभात’मधून ठळक आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्यामुळे विविध ठिकाणी हे विषय पोचतात. ‘सनातन प्रभात’मधील वृत्त वाचून अनेक ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभांची मागणी करण्यात येते. ‘सनातन प्रभात’ने सभांमध्ये मांडलेल्या विचारांनाही व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे समाजात ‘हिंदू संघटित होत आहेत.
हिंदुत्वाच्या चळवळींना ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे ‘सनातन प्रभात’ !
‘खचलेले मन आणि पिचलेले मनगट’, अशी अवस्था असणार्या अन् मरगळ आलेल्या हिंदु समाजाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी, तसेच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी दिशा देणारे ‘सनातन प्रभात’ हे सध्या हिंदूंची आहे ती स्थिती मांडण्याचा प्रयत्न करते. एखाद्या ठिकाणी दंगल झाली किंवा एखाद्या मशिदीतून दगडफेक झाली, तर अन्य वर्तमानपत्रांमध्ये ‘प्रार्थनास्थळांमधून दगडफेक’ किंवा ‘दोन गटांमध्ये मारामारी’, असे वृत्त प्रसिद्ध केले जाते. कुठेही वस्तूनिष्ठ चित्रण करणार्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात नाहीत. ‘लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवणार्या या पत्रकारितेमध्ये एवढेही अवसान आता उरलेले नाही का ?’, असा प्रश्न पडतो. त्यामुळे समाजाला सत्य काय ? हे कळतच नाही; परंतु ‘सनातन प्रभात’मध्ये कोणतीही भीडभाड न बाळगता जसे आहे, तसे सत्य वृत्त छापले जाते. यातून असे लक्षात येते की, समाजामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्भय वृत्ती निर्माण होण्यामध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची असते. हीच भूमिका बोटचेपेपणा आणि सर्वधर्मसमभावी वृत्तीची झाल्यामुळे वृत्तपत्रे वरवरच्या बातम्या प्रसिद्ध करतात. ‘सनातन प्रभात’ परखड बातम्या छापते आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळींना ‘सनातन प्रभात’ ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे एक माध्यम ठरले आहे.
निर्भीड आणि पारदर्शी असे दैनिक ‘सनातन प्रभात’ रौप्य महोत्सव साजरा करत आहे. ‘सनातन प्रभात’चे हे कार्य उत्तरोत्तर वाढत जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदान वृद्धींगत होवो आणि ईश्वराची कृपादृष्टी सतत ‘सनातन प्रभात’, दैनिकाचे सर्व वितरक, साधक आणि कार्यकर्ते यांच्यावर राहो, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती अन् राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ (७.४.२०२४)