अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्‍याने दिले सोन्याचे रामचरितमानस !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली. त्याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. या ताम्रपत्रावरील रामचरितमानसची अक्षरे सोन्याची आहेत. हे रामचरितमानस १ सहस्र पानांचे असून त्याची किंमत ५ कोटी रुपये आहे. तसेच वजन १.५ क्विंटल आहे. या रामचरितमानससाठी ‘अल्ट्राव्हायोलेट प्रिटींग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चेन्नईच्या ‘बुममंडी बंगारू ज्वेलर्स’कडून हे रामचरितमानस बनवण्यात आले आहे. यासाठी ८ मासांचा कालावधी लागला.

श्रीरामनवमीच्या दिवशी २० घंटे मिळणार दर्शन !

अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामनवमीला भाविकांना २० घंटे दर्शन मिळणार आहे. १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत ही व्यवस्था असणार आहे. अयोध्येत १०० ठिकाणी एल्.ई.डी. स्क्रिनवर श्रीरामनवमीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीरामनवमीला येथे प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.