नवी देहली – लहान मुलांना मांडीवर घेतल्यानंतर त्यांच्यामुळे स्वतःचे कपडे खराब होऊ नयेत किंवा झोपतांना मुलांनी पलंग ओला करू नये, यासाठी आजकाल बहुतांश महिला त्यांच्या नवजात बालकांना आणि लहान मुलांना डायपर लावतात. तथापि डायपरची ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. असे केल्याने मुलांच्या मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचे मूत्रपिंड निकामी होऊ शकते, अशी माहिती ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) डॉक्टरांनी दिली आहे.
१. ‘एम्स’च्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या म्हणण्यानुसार, जन्मापासूनच मुलांनी डायपर वापरल्याने त्यांच्या मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो. तसेच डायपर घट्ट असेल, तरीही मुलाच्या मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.
२. नवजात बालककिंवा लहान मुले यांना सतत डायपर लावून पालक त्यांची लघवी करण्याची इच्छा दाबत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
३. जुन्या काळी, जेव्हा डायपर नव्हते, तेव्हा मुलांना कापडाचे लंगोटे बांधले जायचे, जे घट्ट नसायचे. याखेरीज स्त्रिया त्यांच्या मुलांना उचलून घेत असत आणि त्यांना मध्ये मध्ये लघवी करायला लावत असत, जेणेकरून त्यांनी त्यांचे लंगोट किंवा पलंग ओला करू नये; पण आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो.
४. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डायपरचा सतत वापर केल्याने काही वेळा परिस्थिती इतकी बिकट होते की, मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाही करावी लागते.
५. ग्रेटर नोएडा येथील बालरोगतज्ञ डॉ. राकेश गुप्ता सांगतात की, ‘डिस्पोजेबल डायपर’ बनवण्यासाठी सेल्युलोज, पॉलीप्रॉपिलीन, पॉलिथिलीन आणि मायक्रो फायबर्सचा वापर केला जातो, ज्यांच्या अतीवापरामुळे डायपर रॅश, त्वचेचे आजार, दमा आणि यकृत खराब होणे, असे आजार होऊ शकतात.
६. ‘अमेरिकन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स’च्या मते, मुलांचे डायपर साधारणपणे प्रति २ घंट्यांनी पालटले पाहिजेत आणि मल-मूत्र विसर्जनाचा भाग स्वच्छ केला पाहिजे, जेणेकरून तेथे ओलेपणा रहाणार नाही.