अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सूक्ष्मातून सुचलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता. त्या वेळी मी घरी नामजप करत होते. जप करतांना मला एक वटवृक्ष दिसला. ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.

१. ‘अयोध्या नगरीत श्री रामलल्ला विराजमान होणे’, हा दिवस हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीचा दिवस असणे

२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या नगरीत सृष्टीचा पालनकर्ता श्रीविष्णु श्री रामलल्लाच्या स्वरूपात विराजमान झाला आहे. हा दिवस हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीचा दिवस आहे. आज ब्रह्मांडातील देवी-देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषिमुनी आणि इंद्रादी देवता अवकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. ‘वर्ष २०१९ मध्ये न्यायालयात श्रीराममंदिराविषयी निकाल लागून भव्य मंदिर निर्माणकार्य होणे’, ही हिंदु राष्ट्राची छोटी-छोटी मुळे आहेत.

२. वाईट शक्तींच्या विनाशाच्या दृष्टीने धर्मक्रांती होऊन सृष्टीची शुद्धी होणे

वर्ष २०२४ ते २०३० या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या अनुषंगाने वाईट शक्तींच्या विनाशाच्या दृष्टीने धर्मक्रांती, तीव्र प्राकृतिक आपत्काळ आणि महाविनाशकारी तिसरे महायुद्ध यांच्या माध्यमातून देव सार्‍या सृष्टीची शुद्धी करणार आहे.

३. पाश्चात्त्य संस्कृती न आचरता आर्य सनातन वैदिक संस्कृतीनुसार आचरण चालू होणे

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीत सृष्टीच्या शुद्धीच्या प्रक्रियेनंतर जे जीव अस्तित्वात असतील, ते हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष घडवणारे पायाभूत घटक असतील. तेव्हा प्रत्येक जिवाची पातळी न्यूनतम ५५ टक्के असेल. त्या वेळी समाजव्यवस्थेमध्ये कृतीच्या स्तरावर परिवर्तन होईल, उदा. ‘भ्रष्टाचार करणे पाप आहे, नारीशक्तीचा सन्मान करणे’, यांसारख्या तत्त्वांची समाजमनात जागृती करणे, घराघरांतून कृतीच्या स्तरावर धर्माचरण घडणे, हे कार्य होईल. थोडक्यात, पाश्चात्त्य संस्कृती न आचरता सनातन वैदिक संस्कृतीनुसार आर्य आचरण चालू होईल.

४. मनुष्यजन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती असणे आणि याविषयी जागृतीचे कार्य होणे

वर्ष २०३० ते २०४० या कालावधीत समाजमनाचे मानसिक स्तरावर परिवर्तन होईल. ‘मनुष्यजन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती असून आपली सर्व कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे त्या दृष्टीने योग्य क्रियमाणासहित असायला हवीत’, या दृष्टीने जागृतीचे कार्य होणार आहे.

५. हिंदु राष्ट्रासाठी पोषक असा समाज निर्माण होणे आणि पूर्ण सृष्टीच सनातनमय होणे

वर्ष २०४० ते २०७४ या कालावधीत समाजमनाचे आध्यत्मिक स्तरावर परिवर्तन होईल. यासाठी अधिक काळ लागणार आहे; कारण स्थूल आणि मानसिक पालटापेक्षा सूक्ष्म स्तरावर परिवर्तन होण्यास स्वभावदोष, अहं आणि प्रारब्ध यांमुळे अडथळे येतात. त्यांवर मात करत करत हिंदु राष्ट्रासाठी पोषक असा समाज निर्माण होईल.

त्यानंतर त्या वर्षाच्या शेवटी हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजमनात विलीन होतील. त्यांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्देश पूर्ण होईल, म्हणजे पूर्ण सृष्टीच सनातनमय असेल.

६. जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून होणे आणि सर्व काही भगवंताच्या इच्छेनुसार होणे

वर्ष २०७५ मध्ये खर्‍या अर्थाने हिंदु राष्ट्र येईल, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जिवाचे प्रत्येक कर्म हे साधना म्हणून असेल. सृष्टीचे नियमन आणि संचालन भगवंताच्या इच्छेनुसार असेल. अशा प्रकारे पुढच्या ५० वर्षांत सृष्टीचे काळानुसार ३ प्रकारे शुद्धीकरण होऊन हिंदु राष्ट्र स्थापन होईल.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१.२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक