पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ‘कॅशलेस प्रणाली’ बंद !

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात् ‘पी.एम्.पी.एम्.’ने मोठा गाजावाजा करून गतवर्षी ‘कॅशलेस प्रणाली’ चालू केली; मात्र ही प्रणाली सध्या बंद अवस्थेत आहे. ग्राहकांनी ‘कॅशलेस प्रणाली’द्वारे पैसे भरल्यास बसवाहकाकडे असलेल्या प्रणालीत नेटवर्क दीर्घकाळ प्रतिसाद देत नाही आणि पैसे प्रणाली स्वीकारत नाही, अशी स्थिती आहे. अनेक वाहकांकडे असलेल्या यंत्रात ‘नेटवर्क’ समस्येमुळे ही यंत्रणा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सर्वच ‘पी.एम्.टी.’च्या बसमध्ये सध्यातरी ‘कॅशलेस प्रणाली’ बंदच असल्याने वाहक रोख पैसे घेऊनच प्रवाशांना तिकीट देतात. (प्रशासन याविषयी काय उपाययोजना काढणार आहे ? – संपादक)

पुणे शहर वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांसाठी मोठा आधार असलेल्या ‘पी.एम्.टी.’ने अत्याधुनिक होत गतवर्षी मोठ्या हौसेने ‘गूगल पे’, ‘फोन पे’, तसेच अन्य कोणत्याही ‘यु.पी.आय.’द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे सुट्या पैशांची समस्या सुटण्यास साहाय्य होणार होते, तसेच जलद तिकीट उपलब्ध होणार होते; मात्र गतवर्षी चालू केलेली योजना तांत्रिक अडचणींमुळे बंद पडली असून लवकरच नवीन यंत्रे येण्याची शक्यता आहे.