गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !

‘आपल्या ऋषि-मुनींचे म्हणणे आहे की, गुढीपाडव्याला दाराला लावलेल्या तोरणाखालून जो जातो त्याचे ऋतू-परिवर्तनाशी संबंधित रोगांपासून रक्षण होते. नूतन वर्षाला सूर्याेदयाच्या वेळी भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन आणि शंखध्वनी करून नूतन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. गतवर्षात कळतनकळत ज्या चुका झाल्या असतील, त्यांच्यासाठी भगवंताकडे क्षमायाचना केली पाहिजे आणि येणार्‍या वर्षात चुकांपासून वाचून सन्मार्गावर चालण्याचा मनुष्य-जीवनाचे परम ध्येय अर्थात् परमात्म्याची प्राप्ती करण्याचा संकल्प केला पाहिजे. ‘नूतन वर्ष मंगलमय होवो, आनंदमय होवो. भारतीय संस्कृती, तसेच सद्गुरु आणि महापुरुषांच्या ज्ञानाने सर्वांचेच जीवन उन्नत होवो.’ अशा प्रकारे एकमेकांना शुभेच्या देऊन नूतन वर्षाचे स्वागत केले पाहिजे.

कसा झाला गुढीपाडव्याचा आरंभ ?

या दिवशी मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांनी वालीच्या अत्याचारापासून लोकांना मुक्त केले होते. याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला; म्हणून हा दिवस ‘गुढीपाडवा’ नावाने प्रचलित झाला. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीचा आरंभ केला, तेव्हा त्या वेळी या तिथीला ‘प्रवरा’ (सर्वाेत्तम) तिथी सूचित केले होते. यात व्यावहारिक, धार्मिक, सामाजिक, राजनैतिक इत्यादी अधिक महत्त्वाच्या अनेक कार्यांचा आरंभ केला जातो. नूतन वर्षाच्या प्रथम दिनापासूनच चैत्री नवरात्रीचा उपवास चालू होतो. ९ दिवसांचा उपवास करून शक्तीची (देवीची) उपासना केली जाते, ज्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसमवेतच मानसिक प्रसन्नता आणि शारीरिक आरोग्याचा लाभ सहजच मिळतो.

का करतात कडुलिंबाचे सेवन ?

चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते. या दिवशी आरोग्यरक्षण, तसेच चंचल मनाच्या स्थिरतेसाठी कडुलिंबाची पाने खडीसाखर, मिरे, ओवा इत्यादी समवेत प्रसादरूपात खाण्याचे विधान आहे.

तात्त्विक दृष्टीने पाहिल्यास आपल्या जीवनव्यवहारात कडू घोट पिण्याचेही प्रसंग येत रहातात; म्हणून कडुलिंबाचे सेवन करतांना मानसिक सिद्धता केली पाहिजे की, या वर्षात प्रारब्धाने जे काही दु:ख, संकटे, प्रतिकूलता, अपमान इत्यादीचे कडू घोट प्यावे लागतील, त्यांना मी भगवंताची कृपा समजून पचवेन.’

– (साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’, मार्च २०१७)