‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि शिवप्रेमी यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
डिचोली (गोवा), ७ एप्रिल (वार्ता.) – धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर ही ज्वाला डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या बाजूला लोकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. ‘धर्मवीर ज्वाले’चे पूजन करण्यात आल्यानंतर शिवप्रेमींनी तिचे दर्शन घेतले. ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि शिवप्रेमी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली सलग ३ वर्षे ‘धर्मवीर ज्वाला’ डिचोली येथे शिवप्रेमींच्या दर्शनासाठी आणली जाते. यंदाचे हे चौथे वर्ष होते. याप्रसंगी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या गोवा विभागाचे अध्यक्ष मंदार गावडे, पापुराज मयेकर, रोहन शिरगावकर, शुभम माईणकर, मल्लिकार्जुन पाटील, किरण तुळपुळे, सौ. गायत्री पाटील, सौ. सुवर्णा परब, विनायक मुंग्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
धर्मवीर संभाजी महाराज यांचे धर्मप्रेम गोमंतकियांनी मनात रुजवले पाहिजे ! – मंगेश पाटील, ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या सिंधुदुर्ग विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी गोव्याच्या रक्षणासाठी अलौकिक असे कार्य केले आहे. त्यांचे विचार सर्व गोमंतकियांनी मनात रूजवले पाहिजेत. धर्मवीर संभाजी महाराज यांनी केलेले बलीदान हे हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यासाठी होते.
‘धर्मवीर ज्वाले’समवेत आलेल्या सदस्यांचा मोठा त्याग ! – रमेश नाईक, शिवप्रेमी
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिवप्रेमी श्री. रमेश नाईक म्हणाले, ‘‘धर्मवीर ज्वाले’च्या समवेत आलेले सदस्य पुणे येथून भर उन्हात तापलेल्या डांबरी रस्त्यावरून अनवाणी गोव्यात आलेले आहेत. हा त्यांचा मोठा त्याग आहे आणि हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी पुष्कळ मोठा त्याग केला. तलवारीच्या बळावर हिंदु धर्माचे रक्षण करून त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले.’’
धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची आजही आवश्यकता ! – गोविंद चोडणकर, शिवप्रेमी
याप्रसंगी शिवप्रेमी गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार अन् त्यांचे कार्य यांची आताच्या घडीला आवश्यकता आहे. त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. सध्या काही धर्मद्रोही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानाचा संबंध गुढीपाडव्याशी जोडून लोकांमध्ये चुकीचा समज पसरवत आहेत. सनदशीर मार्गाने धर्मद्रोह्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.’’ या वेळी शिवप्रेमी श्री. जयेश थळी यांचेही मार्गदर्शन झाले.
‘धर्मवीर ज्वाले’चा प्रवास
‘धर्मवीर ज्वाला’ ही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वढु बुद्रुक, पुणे येथील समाधी स्थळावरून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत आहे. सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. डिचोली येथून ही ‘धर्मवीर ज्वाला’ सावंतवाडी, महाराष्ट्र येथे नेण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.