‘चांदी कारखानदार असोसिएशन, हुपरी’ यांच्या प्रयत्नांमुळे चांदी दागिन्यांना ‘जीआय’ मानांकन प्राप्त ! – दिनकरराव ससे, उपाध्यक्ष, चांदी कारखानदार असोसिएशन

पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देतांना डावीकडून तिसरे श्री. दिनकरराव ससे, तसेच अन्य मान्यवर

कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) – हुपरी येथे सिद्ध होणार्‍या हस्तकलेला सुरक्षितता लाभण्यासाठी, तसेच येथील हस्तकौशल्याचा अपलाभ इतर ठिकाणी घेतला जाऊ नये, यांसाठी ‘चांदी कारखानदार असोसिएशन, हुपरी’ यांच्या वतीने वर्ष २०१४ पासून हुपरी येथील चांदी उत्पादित दागिन्यांना ‘जीआय’ मानांकन (हे मानांकन एखादी वस्तू/पदार्थ हे खास दर्जाचे किंवा एकमेवाद्वितीय असल्याची पावती होय) प्राप्त होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न चालू होते. यासाठी लागणारे दस्ताऐवज, छायाचित्र देण्यात आली. अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर शासनाने ‘जीआय’ मानांकन संमत केले आहे. याचा लाभ चांदी उद्योजक आणि कारागीर यांना मिळणार आहे, अशी माहिती ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ससे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. दिनकरराव ससे पुढे म्हणाले, ‘‘विविध प्रकारचे सुबक चांदी हातकला दागिने बनवण्यासाठी हुपरी हे ठिकाण शतकोत्तर काळापासून प्रसिद्ध आहे. चांदी कारखानदार असोसिएशन ही संस्था वर्ष १९४४ पासून गेली ८० वर्षे कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून चांदी उद्योगासाठी विविध शासकीय योजना राबवणे, कारागीर-उद्योजक यांच्यात समन्वय ठेवणे यांसह अन्य कामे केली जातात. ‘जीआय’ मानांकन संमत झाल्यामुळे आमच्या दागिन्यांची ‘नक्कल’ कुणाला करता येणार नाही, तर आता सुरक्षित असतील. आम्ही सर्व ‘क्लस्टर’साठी प्रयत्नशील होतो, तेही आता संमत झाले आहे.’’

या प्रसंगी अध्यक्ष श्री. चंद्रशेखर नाईक, सदस्य सर्वश्री सूर्यकांत जाधव, बबन भोसले, रावसाहेब चौगुले, आण्णासाहेब म्हेतर, संभाजी शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.