सोलापूर येथे लक्ष्मीनारायण सेवा संघाच्या वतीने ‘शिवपुराण’ कथा !

पंडित प्रदीप मिश्रा

सोलापूर – येथील मारवाडी समाजाच्या ‘लक्ष्मीनारायण सेवा संघा’च्या वतीने ६ ते १२ जून या कालावधीत भव्य ‘शिवपुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित प्रदीप मिश्रा हे शिवपुराण कथेचे निरूपण करणार असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली. शिवपुराण कथेचा सोलापूर येथील भक्तांना लाभ व्हावा, या उद्देशाने गेली वर्षभर संस्था प्रयत्नरत आहे. कारंबा रस्ता येथील भव्य अशा पटांगणावर ५ लाख भक्तांसाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रतिदिन दुपारी ३ ते सायंकाळी ५ हे निरूपण केले जाणार आहे.

कार्यक्रमाला देवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पूजा !

ग्रामदैवत आणि भगवान शिव यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याच्या उद्देशाने संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि पुरोहित ब्रिजमोहन व्यास यांनी एका पूजेचे आयोजन केले होते. शिवपुराण निरूपण निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्री सिद्धरामेश्वर स्थापित ६८ शिवलिंगांपैकी ३२ वे शिवलिंग श्री शतकेश्वर महादेवाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रुद्राभिषेक करून संकल्प सोडण्यात आला. या वेळी मधुसूदन कालाणी, चंद्रकांत तापडिया, जवाहर जाजू, चिदानंद मुस्तारे इत्यादी उपस्थित होते.

पंडित प्रदीप मिश्रा यांचे सोलापूरकरांना आवाहन

सोलापूर ही श्री विठ्ठल आणि श्री सिद्धरामेश्वरांची नगरी आहे. तेथे शिवपुराणाचे निरूपण करण्यासाठी मी उत्सूक आहे. सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा.