सातारा, ३ एप्रिल (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी ६ सहस्र ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अनुमतीप्राप्त ३ सहस्र २२८ अग्नीशस्त्रांपैकी १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात शासनाधीन करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. ते म्हणाले की, १ सहस्र ३९७ आरोपींपैकी १ सहस्र ३४२ आरोपींचा शोध चालू आहे. पहिल्या टप्प्यात ५५ आरोपींना शोधण्यात आले. मतदारांना मद्य, पैसे, भेटवस्तू देण्याविषयीच्या कारवाईत ३३ सहस्र ८६० रुपये रोख रक्कम, तसेच ५ सहस्र ३१ लिटर मद्य शासनाधीन करण्यात आले आहे. २५ पोलीस ठाण्यांच्या सीमेत १८ संवेदनशील क्षेत्रे आहेत. जिल्ह्यात २४ वेळा कोंबिंग ऑपरेशन (धरपकड) आणि १० वेळा नाकाबंदी करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ३ पोलीस कर्मचार्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर १७ ठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यात आले असून ते सी.सी.टी.व्ही.ने सुसज्ज आहेत. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी सीमा सुरक्षा दलाची १ तुकडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची १ तुकडी आणि होमगार्डची अधिकची तुकडी सिद्ध ठेवण्यात आली आहे.