संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

‘अनेक जन्मींची जी कर्मे साचलेली असतात, ती सर्व कर्मे वासनेत गुप्त आहेत, त्यास ‘संचित’ म्हणतात (संचित म्हणजे कर्मे, भोग नव्हेत.) जेव्हा जेव्हा जसे जसे वाट्याला आले, तसे तसे तेव्हा तेव्हा ते भोगलेच पाहिजे. एका देहात अनेक योनींचे पाप-पुण्य कर्म असते. इतके एकदाच भोगता येत नाही, तर त्यातील काही भाग भोगावे लागते. याविषयीचे विवेचन पुढे दिले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्रं

१. प्रारब्ध

या जन्मी संचित कर्माचे देहाचे भोग वाट्यास आलेले शुभ वा अशुभ फल असते, त्यास ‘प्रारब्ध’ म्हणतात. प्रारब्ध हे भोग आहेत.

२. क्रियमाण

या जन्मी देहात येऊन जे जे कर्म करतो, त्यास ‘क्रियमाण’ म्हणतात. क्रियमाण हे कर्म आहे, हे संचितात विलीन होते. संचित आणि क्रियमाण ही ‘कर्मे’ आहेत. प्रारब्ध हा ‘भोग’ आहे.

३. ‘वासना’ नाहीशी करण्याचे महत्त्व

वासनेच्या योगाने प्राण्यास जन्म-मरण प्राप्त होते. पूर्वीच्या वासनेने देह उत्पन्न होतो आणि तो प्रारब्ध सरताच मरतो. मेल्यावर पुढे दुसरा देह धरतो. याप्रमाणे अनेक योनीत जन्म होतात. प्राणी जन्मतःच साकार प्रकट होतो आणि मरताच साकार वासनेत गुप्त रहातो. जेव्हा स्वतःचे अज्ञान नाहीसे होईल आणि स्वरूपाचे ज्ञान होईल, तेव्हाच ही ‘वासना’ नाहीशी होईल. ही दृढ वासना हाच सूक्ष्म देह आणि तो स्थुल जड देहास वागवतो.

४. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

आता हेच आपण संगणकाच्या (कॉम्प्युटरच्या) भाषेत पाहूया.

अ. संचित : म्हणजे अनेक जन्म तुमचे स्वतःचे लिहिलेले ‘सॉफ्टवेअर’ (संगणकीय प्रणाली) (म्हणजे होऊन गेलेली कृती अथवा कर्म)

आ. प्रारब्ध : म्हणजे ‘सॉफ्टवेअर’मधील (म्हणजे संचितामधील) या जन्मात भोगावा लागणारा भाग.

इ. क्रियमाण : म्हणजे चालू जन्मात स्वतःचे लिहिले जाणारे ‘सॉफ्टवेअर’ (म्हणजे चालू जन्मातील कर्म)

५. कर्मानुसार फळ मिळणे

‘सॉफ्टवेअर’ हे कायम स्वरूपाचे झाले ते पालटत नाही; परंतु ‘हार्डवेअर’ (संगणकाचे सुटे भाग) म्हणजे देह पालटू शकतो. अनेक देह घेऊन तो जीव आपल्या वासनांप्रमाणे ‘सॉफ्टवेअर’ लिहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याची फलप्राप्ती म्हणजे जन्माच्या पाठीमागून जन्म आणि त्याप्रमाणे सुख, दुःख, व्याधी भोगतो. हेच त्या जैविक देहाच्या संगणकीय देहाची फलनिष्पत्ती अथवा निकालरूपी फलप्राप्ती. ‘सॉफ्टवेअर’ शुभ वासनेने लिहिलेले असेल, तर शुभ फळे, अशुभ वासनेने लिहिलेला असेल, तर अशुभ (दुःखदायक) फळे मिळतील. दोन्ही असतील, तर मिश्र फळे मिळतील.

(साभार : मासिक ‘संतकृपा’, एप्रिल १९८८)