‘अगदी पौराणिक काळापासून कायद्याने स्त्रीला पुष्कळ संरक्षण दिलेले आहे. आपला भारतीय समाज मिताक्षर (जन्मामुळे मिळणारी मालकीत्व) आणि दयाभाग (कुणाच्या मृत्यूमुळे मिळणारे मालकीत्व) या दोन कुटुंब व्यवस्थेमध्ये दडलेला आहे. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत स्त्री ही ‘रांधा वाढा, उष्टी-खरकटी काढा, मुलांचे संगोपन आणि घरातील सेवा’ यांतच अजूनही दडलेली असते. भारतीय समाजात स्त्रीला जो खरा दर्जा द्यायला हवा, तो दुर्दैवाने अजूनही नीट दिला गेलेला नाही. राज्यघटनेमध्येही स्त्रियांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे; परंतु पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अशा कित्येक अभागी गरीब स्त्रियांना अजूनही त्यांच्या मूलभूत आवश्यकतांपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी अपवादसुद्धा असतातच.
१. स्त्रीधन म्हणजे काय ?
स्त्रीधन हा असाच एक अधिकार कायद्याने महिलांना दिलेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय महिला नोकरी आणि रोजगारात अभावानेच असायच्या. त्यामुळे त्यांचे आर्थिक भरण-पोषण हे घरातील कमावत्या पुरुषांकडूनच असायचे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्या पूर्णपणे कमावत्या पुरुषावरच अवलंबून असायच्या. यामुळेच आपल्या कायद्यातील प्रावधानांनुसार (तरतुदींनुसार) महिलांना स्त्रीधनाचा हक्क देण्यात आलेला आहे. नावाप्रमाणेच स्त्रीधन, म्हणजे स्त्रीकडे असलेले धन. स्त्रीधन म्हणजे नुसतेच पैसे नसून दागदागिने, वस्तू यांचाही त्यामध्ये समावेश होतो. अर्थात् प्रत्येक वस्तूच स्त्रीधन होते, असे नाही. ती संपत्ती तिला कुठून प्राप्त झाली ? ती संपत्ती मिळवण्याच्या वेळेस तिचा दर्जा काय होता ? अविवाहित, विवाहित, घटस्फोटीत, विधवा, लहान मुलगी अशा कोणत्या पात्रतेमध्ये ती होती ? ती कोणत्या कुटुंबाला मान्यता प्राप्त आहे ? मिताक्षर कि दयाभाग ? या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच ती संपत्ती स्त्रीधन आहे कि नाही ? हे ठरवावे लागते.
२. स्त्रीधनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?
स्त्रीधन या व्याख्येत खालील ठळक गोष्टींचा समावेश होतो.
अ. तिच्या नातेवाइकांकडून तिला मिळालेल्या भेटवस्तू
आ. अविवाहित असतांना कोणत्याही ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तींकडून मिळालेल्या वस्तू, पैसे, भेटवस्तू अथवा कोणतीही संपत्ती
इ. कायद्याने देखभाल करण्यासाठी स्वरूपात दिलेली संपत्ती
ई. वाटणीतील हिस्सा तिला मिळालेला असल्यास
उ. स्वकष्टार्जित कमाईतून घेतलेली संपत्ती
ऊ. तडजोडीतून मिळालेली संपत्ती
ए. लग्नाच्या आधी, लग्नामध्ये, लग्नानंतर सासर आणि माहेर यांच्याकडून घालण्यात आलेले सर्व दागदागिने हे सर्व स्त्रीधनाच्या व्याख्येमध्ये येतात.
३. स्त्रीधनाच्या प्रकारांना दिलेली नावे
अ. अध्याग्नी : लग्नाच्या वेळेस दिलेले दागिने
आ. अध्यवहारिका : नववधू सासरी जात असतांना तिला दिलेल्या सर्व वस्तू
इ. प्रीतीदत्ता : प्रेमाखातर सुनेला सासू आणि सासरे यांनी दिलेले दागिने, वस्तू अन् अलंकार
ई. पतीदत्ता : नवर्याने तिला दिलेल्या सर्व वस्तू आणि अलंकार
उ. पदन्वदाविका : थोरामोठ्यांना नमस्कार केल्यावर मिळालेल्या भेटवस्तू
ऊ. आधिवेदनिका : दुसरी बायको केल्यानंतर पहिल्या बायकोला दिलेले सर्व दागिने, वस्तू आणि अलंकार
ए. शुल्क : लग्नात मिळालेले पैसे
ऐ. बंधूदत्त : आई-वडील आणि भाऊ यांच्याकडून मिळालेले दागिने, वस्तू अन् अलंकार
अशा प्रकारे स्त्रीधनाचा पूर्णपणे अधिकार स्त्रियांना दिलेला आहे.
४. महिलांना राज्यघटना आणि कायदा यांचे मुबलक संरक्षण
स्त्रिया त्यांची संपत्ती स्वतःच्या मालकीने कसेही नियोजन करू शकतात, विल्हेवाट लावू शकतात किंवा कुणालाही स्वेच्छेने ती दानही करू शकतात. घटस्फोट झाल्यानंतर सासरच्या व्यक्तींनी घातलेले सर्व दागिने त्या घटस्फोटीत स्त्रीकडेच जातात. एखाद्या पीडित महिलेला जिचे स्त्रीधन सासरकडील व्यक्तींनी हडप केलेले असेल, तर तशा अबला स्त्रियांसाठी महिला आधारकेंद्र, महिला आयोग अशा संस्था तिचे स्त्रीधन मिळवून देण्यासाठी कायम साहाय्य करतात. थोडक्यात महिलांना राज्यघटना आणि कायदा यांनी पुष्कळ संरक्षण बहाल केलेले आहे; परंतु योग्य पीडित महिलेलाच न्याय दिला जातो. अलीकडच्या काळात विनाकारण खोट्या तक्रारींचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे. त्यामुळे ‘सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत’, अशी सार्वत्रिक आवई उठवली जाते, ती पूर्णपणे चुकीची आहे. कायद्याचा दुरुपयोग अधिक केला जातो आणि ज्या खर्या खुर्या पीडित महिलेला न्याय हवा आहे, ती कायमच वंचित रहाते.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.