आंबा प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा !

आंबा हे सगळ्यांचे आवडते फळ आहे; पण आंब्याविषयी अनेक गैरसमज आहेत. लोकांना वाटते, ‘आंबा खाल्ला की, वजन वाढेल किंवा रक्तातील साखर वाढेल.’ म्हणूनच आंब्याविषयी शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे आणि मगच ठरवावे की, आंबा खायचा कि नाही ?

हापूस आंबा

१०० ग्रॅम आंबा म्हणजे ६० ते ७० कॅलरिज. १०० ग्रॅम आंबा म्हणजे मध्यम आकाराचा अर्धा आंबा. ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ (रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची कार्बोहायड्रेट अन्नाची सापेक्ष क्षमता दर्शवणारी संख्या) ५६ आहे, जो मध्यम स्वरूपाचा आहे, म्हणजे आंब्यामुळे साखर (शुगर) पटकन वाढत नाही; पण एकाच वेळी ४ आंबे खाल्ले तर मात्र साखर वाढणार.

१. आंब्यातून कोणती पोषणमूल्ये मिळतात ?

आंब्यातून कोणती पोषणमूल्य मिळतात ? हे आपल्याला सर्वांत आधी माहिती असणे महत्त्वाचे आहे.

अ. जीवनसत्त्वे (व्हिटामिनस) : यात सगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे आहेत, उदाहरणार्थ आपल्याला दिवसभरात लागणारे निम्मे ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटामिन सी) आंब्यातून मिळते, ज्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती वाढते आणि शरिरात लोहाचे शोषण व्हायला साहाय्य होते. आपल्याला ‘अ’ जीवनसत्त्व सुद्धा आंब्यातून मिळते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते आणि त्वचा चांगली रहाण्यास साहाय्य होते.

डॉ. प्रणिता अशोक
आ. आंब्यात कॅल्शियम, लोह आणि ‘फायबर्स’ (तंतूमय पदार्थ) असतात. आंब्यामध्ये ‘फायबर्स’ बर्‍याच प्रमाणात असल्यामुळे त्याचा वजन न्यून करतांना लाभ होतो.

इ. यासह ‘अँटी-ऑक्सिडंट’ही असतात, जे हृदयाच्या आरोग्याला महत्त्वाचे आहेत आणि कर्करोगाला प्रतिबंध करायला साहाय्य करतात.
ई. समतोल आहारात आपल्याला सगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे (मिनरल्स), प्रथिने (प्रोटीन्स), कर्बोदके आणि चरबी (फॅटस) मिळायला पाहिजेत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंबा. जेव्हा आंब्याचा सिजन असतो, तेव्हा आंबा खायला हरकत नाही. प्रतिदिन १ आंबा खायला काही हरकत नाही, जर वजन स्थिर रहात असेल तर.

२. मधुमेह असणार्‍यांनी घ्यावयाची काळजी

मधुमेह असेल, तर हेच प्रमाण ठेवावे. आंबा खाल्ल्यावर प्रति २ घंट्यांनी साखर पडताळावी आणि साखर अधिक प्रमाणात वाढत नसेल, तर आंबा खायला काही हरकत नाही. २-३ वेळा साखर पडताळावी, जेणेकरून आंबा खाल्ल्यावर समजेल की, आंबा खायचा कि नाही ? आंबा हा पोषक आहे. मग आंबा खायला का घाबरायचे ? पण आंबा प्रमाणात खा, म्हणजे वजन आणि मधुमेह हे दोन्हीही आटोक्यात ठेवायला साहाय्य होईल, तसेच वैद्यकीय सल्लाही घ्या.

आंबा खायची इच्छा पूर्ण झाल्यामुळे समाधान मिळते आणि स्वतःचे शरीरही चांगला प्रतिसाद देते. किती प्रमाणात आंबा खातो, त्यावरूनच ठरेल की, आंबा हे औषध म्हणून आरोग्य चांगले ठेवायला कि त्याच्यामुळे औषध घ्यावे लागेल ? आंबा औषध म्हणून खायचा असेल, तर प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा.

– डॉ. प्रणिता अशोक, एम्.बी.बी.एस्., एम्.डी., पीएच्.डी. (आहार सल्लागार), पुणे.

(डॉ. प्रणिता अशोक यांच्या फेसबुकवरून साभार)