पुणे शहरातील बसस्थानक आणि बसथांबे परिसरात रिक्शा उभी करणार्‍यांवर कारवाई !

३ मासांमध्ये १ सहस्र ६२० रिक्शाचालकांवर कारवाई

३ मासांमध्ये १ सहस्र ६२० रिक्शाचालकांवर कारवाई

पुणे – पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसचालकांना अडथळा निर्माण होईल, अशाप्रकारे रिक्शा चालवणार्‍या आणि बसस्थानक, बसथांबे या ठिकाणी येऊन बस प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रिक्शाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ३ मासांमध्ये अशा बेशिस्त १ सहस्र ६२० रिक्शाचालकांवर पी.एम्.पी.एम्.एल्. आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. यांसह स्वारगेट पोलिसांकडून अशा रिक्शांसमवेत ओला, उबेर, खासगी प्रवासी अशा एकूण ५३९ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईतून २ लाख ३२ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (केवळ आर्थिक दंड करून चालणार नाही, तर कडक कारवाई करत त्यांचा वाहन चालवण्याचा परवानाही जप्त केला पाहिजे ! – संपादक)

पी.एम्.पी.एम्.एल्. बसस्थानके आणि बसथांबे यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्शाचालकांना रिक्शा थांबवता येत नाही, असा नियम आहे; मात्र रिक्शाचालक या नियमाकडे दुर्लक्ष करून नेहमीच बसथांब्यासमोर, बसस्थानकांच्या परिसरात येऊन प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे बसचालकांना गाडी चालवतांना अडथळा निर्माण होतो, अशी तक्रार प्रवाशी, प्रवासी संस्था आणि संघटना यांनी पी.एम्.पी.एम्.एल्.च्या प्रशासनाकडे केली होती. (अशी तक्रार का करावी लागते ? स्थानिक प्रशासनाला हे दिसत नाही का ? ‘नियम हे पाळण्यासाठी असतात’, हे स्वत:च्या आर्थिक लाभासाठी विसरलेले उद्दाम रिक्शाचालक ! – संपादक)

पी.एम्.पी.एम्.एल्.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी आदेश दिल्यानंतर कारवाईस प्रारंभ झाला. वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक सिद्ध करण्यात आले. या पथकांसमवेत पी.एम्.पी.एम्.एल्. कडील ४ सेवक आणि १ प्रादेशिक परिवहन विभागातील १ अधिकारी यांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी प्रत्येकी १-१ अशी २ संयुक्त दक्षता पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

पुण्यातील उद्दाम रिक्क्षाचालक ! पैशांसाठी जनतेला त्रास देणार्‍या रिक्शाचालकांवर नियमितपणे कारवाई का होत नाही ?