दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुजरात येथे मद्याची तस्करी, ३१ लाख रुपयांचा माल जप्त !; अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या दिग्दर्शकाला अटक !…

गुजरात येथे मद्याची तस्करी, ३१ लाख रुपयांचा माल जप्त !

नवापूर (जिल्हा नंदुरबार) – नवापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस यांनी येथे पिकअप वाहनातून भाजीपाल्याच्या क्रेटच्या खाली असलेला मद्याचा अवैध साठा पकडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई समजली जात आहे. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. १ एप्रिलच्या मध्यरात्री २ ते ३ या कालावधीत नवापूर येथे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमावर्ती भागात ही कारवाई करण्यात आली. मद्याची किंमत १८ लाख ५० सहस्र रुपये, तर दोन्ही वाहनांची किंमत १२ लाख ५० सहस्र रुपये अशी मिळून एकूण ३१ लाख रुपये एवढी आहे.


अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या दिग्दर्शकाला अटक !

मुंबई – लग्नाचे आश्वासन देऊन २६ वर्षीय अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिग्दर्शक अभिजीत याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

नाशिक येथे पुन्हा दुचाकींच्या चोरीत वाढ !

नाशिक – शहर आयुक्तालय हद्दीमध्ये पुन्हा ५ दुचाकींची चोरी वाढली आहे. या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. १ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या दुचाकींची चोरी झाली आहे.

संपादकीय भूमिका

वारंवार होणारी वाहनांची चोरी राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे दर्शवते !


मुंबईत ४ गावठी पिस्तुले आणि ५९ जिवंत काडतुसे जप्त !

मुंबई – गावठी पिस्तूल आिण जिवंत काडतुसे यांच्या माध्यमातून व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी या प्रकरणी ४ गावठी पिस्तुले आणि ५९ जिवंत काडतुसे हस्तगत करून दोन आरोपींना अटक केली आहे. फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी आणि शाकीर अब्दुल वहाब चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.


क्षुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !

आधुनिक युगातील कौटुंबिक दु:स्थिती !

डोंबिवली – पत्नी सतत भ्रमणभाषवर बोलत असल्याचा राग आल्याने पतीने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने आक्रमण केले आणि तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर घायाळ झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पती-पत्नी दोघेही मद्यपी आहेत. सुरेखा राजू हिवाळे (वय ४७ वर्षे) असे पत्नीचे, तर राजू हिवाळे (वय ५३ वर्षे) असे फरार पतीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.