भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

श्रीलंकेचे मंत्री जीन थोंडमन यांचे विधान

भारताचे श्रीलंकेजवळील कच्चाथिवू बेट

कोलंबो (श्रीलंका) – कच्चाथिवू बेट श्रीलंकेच्या सीमेत येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही. जर अशी कोणती भूमिका भारताने मांडली, तर त्यावर आमचे परराष्ट्र मंत्रालय उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचे मंत्री जीन थोंडमन यांनी व्यक्त केली. ३ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचे श्रीलंकेजवळील कच्चाथिवू बेट श्रीलंकेला आंदण दिल्याचा आरोप केला होता. त्यावर थोंडमन यांना विचारणा केली असता त्यांनी वरील उत्तर दिले.

सरकार पालटले म्हणून सीमा पालटता येत नाहीत ! – अन्य एका मंत्र्याचे विधान

अन्य एका मंत्र्याने भारतातील एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्‍नाला नाव न छापण्याच्या अटीवर उत्तर देतांना म्हटले की, जे काही असेल; पण आता कच्चाथिवू श्रीलंकेच्या सीमेत आहे. एकदा या सीमा निश्‍चित झाल्या, तर केवळ एखाद्या देशातील सरकार पालटले म्हणून त्या पालटता येत नाहीत. श्रीलंकेच्या मंत्रीमंडळात यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. भारताकडून यासंदर्भात आमच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही.

या मंत्र्याने पुढे म्हटले की, जर कच्चाथिवूचे सूत्र तमिळ समुदायाच्या संदर्भात आहे, तर तमिळ जनता दोन्ही देशांमध्ये आहे. जर हे तमिळ मासेमार्‍यांचे सूत्र असेल, तर यात दोन गोष्टींचा संबंध जोडणे चुकीचे आहे; कारण भारतीय मासेमार्‍यांच्या संदर्भातील खरी समस्या ही त्यांच्याकडून भारतीय सागरी सीमेच्या बाहेर ‘बॉटम ट्रॉलर्स’चा (मासेमारी नौकांचा) वापर करण्यासंदर्भात आहे. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांनुसार हे अनधिकृत आहे.