डावी विचारसरणी म्हणजे केवळ फसवणूक आणि अप्रामाणिकपणा असल्याचीही टीका
मैसूरू (कर्नाटक) – डाव्या विचारसरणीच्या साहित्यिकांची भूमिका दुतोंडी असते. तत्त्व किंवा सिद्धांत यांच्या संदर्भातही डाव्यांची विचारसरणी दुतोंडीच असते, असा आरोप ज्येष्ठ लेखक एस्.एल्. भैरप्पा यांनी केला. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
१. एस्.एल्. भैरप्पा पुढे म्हणाले की, बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्यांची सत्ता होती. डावे नेहमी भांडवलदारांवर टीका करतात, तथापि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांची मुले मात्र भांडवलदार बनून काहीतरी करत असतात. हा त्यांचा दुतोंडीपणाच आहे. बंगालमध्ये असलेली गरिबी इतर कोणत्याही राज्यात नाही. डावी विचारसरणी म्हणजे केवळ फसवणूक आहे. मला हे सर्व जण भांडवलदार म्हणतात. भांडवलदार नसतील, तर देशाचा उत्कर्ष होणारच नाही. डावे विचारवंत हे अप्रामाणिक असतात.
२. एस्.एल्. भैरप्पा यांनी राज्यातील मागील भाजप सरकारवर आणि आताच्या काँग्रेस सरकारवर टीका करतांना म्हटले की, गेल्या खेपेला भाजप सरकारने योग्य रीतीने काम केले नाही, त्याचा लाभ काँग्रेसने उठवला. काँग्रेस सरकारच्या फुकट योजनांमुळे राज्याच्या आर्थिक क्षमतेवर परिणाम होत आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्राकडून मिळालेले अनुदान राज्य सरकार विनामूल्य योजनांसाठी वापरत आहे.