सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

घर जवळ असूनही ‘सणावारी आश्रमात राहून सेवा करूया’, असे साधिकेला वाटणे आणि ‘हे प्रगतीचे लक्षण आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा मी त्यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्याचे दिलेले उत्तर पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मी : परात्पर गुरु डॉक्टर, मागील ११ वर्षांपासून मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत आहे. पूर्वी मी आश्रमातून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील आमच्या घरी वर्षातून एकदाच आणि अल्प कालावधीसाठी जायचे. आता आम्ही गोव्यात आश्रमाजवळच घर घेतले आहे. ‘घरी सणाच्या दिवशी घर सजवणे, काहीतरी गोड पदार्थ बनवणे’ इत्यादी गोष्टी कराव्या लागतात; परंतु घर जवळ असूनही मला कधीच ‘सणाला घरी जावे, घरी काहीतरी वेगळे करावे, सजावट करावी, पदार्थ बनवावेत’, असे वाटत नाही. मला तशी इच्छाही होत नाही. केवळ माझ्या घरच्यांना वाटते; म्हणून मी मला जमेल तेवढ्या घरातील काही गोष्टी करते. याउलट मला ‘आश्रमातच राहून सेवा करूया’, असे वाटते. गुरुदेव, असे वाटणे, हे माझ्यातील आळशीपणामुळे आहे कि निराशेमुळे आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे चांगले आहे. आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे.’

– एक साधिका, फोंडा, गोवा.